मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सलमान खान याची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी सलमानचे वडील सलीम खान, हेलन यांची भेट झाल्याचं आशिष शेलार यांनी एक्स पोस्टवरुन कळवलेलं आहे. या लंच डिप्लोमसीत परिसरातील सामाजिक कार्य आणि आरोग्य सेवांबाबत चर्चा झाल्याचंही शेलारांनी सांगितलंय.
सलमान खानची भेट का महत्त्वाची
बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नुकताच महायुतीत प्रवेश केला आहे. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरुपम यांच्यासारखे काँग्रेसचे बडे नेते महायुतीच्या मार्गावर दिसतायेत. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात सलमान खान वास्तव्यास आहे. या ठिकाणी वांद्रे परिसरात मुस्लीम मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. या मतदारांना आकर्षित करण्यासाठीही सलमान खानची भेट महत्त्वाची मानण्यात येतेय. फिल्मसिटीतही सलमान खानचं स्वताचं वर्तुळ आहे. त्याचाही फायदा भाजपाला होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही
उत्तर मध्य मुंबईतून कोण उमेदवार
उत्तर मध्य मुंबईचा भाजपाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. पूनम महाजन या लोकसभा मतदारसंघातून गेल्या दोन टर्म निवडून आलेल्या आहे. यावेळी या मतदारसंघातून कुणाला तिकीट मिळणार याची उत्सुकता आहे. काही सेलिब्रिटींशीही भाजपाकडून चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. आशिष शेलार यांच्याही नावाची या जागेसाठी चर्चा आहे.