मुंबई – महायुतीच्या जागावाटपात शिंदेंच्या शिवसेनेला कराव्या लागत असलेल्या तडजोडींमुळे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते नाराज आहेत. रामटेक, धाराशिव, नाशिक, रत्नागिरी सिंधुदुर्ग, ठाणे, संभाजीनगर या हक्कांच्या जागांवर भाजपाकडून दावा करण्यात येतोय. यात काही जागा भाजपाला किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्याची वेळ शिंदेंवर आलेली आहे. अशात ही नाराजी उघडपणे व्यक्त होताना दिसतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव होता, त्यामुळे रामटेकमधून मागे हटलो, असं विधान कृपाल तुमाने यांनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच त्यांनी व्यथा मांडताना शिंदे यांच्यावर दबाव असल्याची जाहीर कबुलीच दिलीय.
भाजपावर जोरदार टीकास्त्र
रविवारी शिंदे गटाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांच्यासमोर कृपाल तुमाने यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केलीय. मुख्यमंत्री शिंदे हे अखेरच्या क्षणापर्यंत तुमाने यांच्या तिकीटासाठी आग्रही होते. मात्र त्यांच्यावर दबाव होता, त्यामुळे आपण मागे हटल्याचं तुमाने यांनी सांगितलंय. पक्षासाठी काम करा, असं शिंदेंनी सांगितलं. मनात दु:ख होतं. मात्र शेवटपर्यंत शिंदेंच्यासोबत राहणार असल्याचं तुमाने म्हणालेत. यावेळी तिकीट मिळालं असतं तर एका लाखांहून अधिक मतांनी विजयी झालो असतो, असंही तुमाने म्हणालेत.
काही जणं आमच्यासोबत राहतातस मजबूत होतात आणि नंतर आमच्याच लोकांना घेऊन पळतात, अशी टीका त्यांनी भाजपावर केलीय. या मेळाव्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तुफान घोषणाबाजीही केली.
रामटेक लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचं तिकिट कापून त्यांच्याऐवजी काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आलीय.