मुंबई- वंचित बहुजन महासंघाचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर ज्या अकोला मतदारसंघातून रिंगणात आहेत, त्या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला आता लक्ष्य करण्यात येतंय. अकोल्यात संघ संस्कारात वाढलेल्या अभय पाटील यांना काँग्रेसनं उमेदवारी दिल्याचं सांगत वंचितनं त्यावर आक्षेप घेतलाय. नाना पटोले हे भाजपाचे स्लीपर सेल असल्याचा आरोपही वंचितच्या वतीनं करण्यात येतोय. दुसरीकडं महायुतीपासून फारकत घेतलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीनं काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय. यातून अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झालेलं आहे.
काँग्रेसचे उमेदवार आहेत तरी कोण
या लढतीत काँग्रेसनं डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिलीय.
- संघ आणि विश्व हिंदू परिषदेतून सामाजिक कार्यात
- गेली अनेक वर्ष काँग्रेससोबत
- पश्चिम विदर्भातील नामवंत अस्थिरोगतज्ज्ञ
- वडील डॉ. के. एस पाटील हे विश्व हिंदू परिषदेशी संबंधित
- डॉ. अभय पाटील काँग्रेसचे प्रदेश सचिव
- 2019 लोकसभा लढवण्यासाठीही होते इच्छुक
- सरकारी नोकरीचा राजीनामा न स्वीकारल्याने संधी हुकली
- छावा संघटना, मराठा क्रांती मोर्चातून चळवळीत सक्रिय
- वैद्यकीय क्षेत्रासोबत सामाजिक कार्यात दबदबा
डॉ. अभय पाटील यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध असल्याचं सांगण्यात येतंय. गटातटाच्या राजकारणात अभय पाटील सक्रिय झाल्यानंतर काही पदाधिकारी दूर जाण्याची शक्यता आहे.त्यातच वंचितनं आता अभय पाटील यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतलाय. संघाच्या मुशीत वाढलेल्या अभय पाटील यांना काँग्रेसनं उमेदवारी का दिला, असा सवाल वंचितनं विचारलाय. त्याबरोबरच नाना पटोले हे भाजपाचा स्लीपर सेल म्हणून काम करत असल्याचा आरोपही करण्यात आलाय.
भाजपाकडून अनुप धोत्रे यांना संधी
सलग चारवेळा या मतदारसंघात विजयी झालेले संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना भाजपानं संधी दिलीय.प्रकृती अस्वस्थ्यामुळं संजय धोत्रेंऐवजी अनुप धोत्रेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अनुप धोत्रे यांची भाजपाच्या कार्यकर्त्यांत क्रेझ असून, त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर चांगलं आव्हान निर्माण केलेलं आहे.
कोणता मुद्दा प्रचाराचा
आंबेडकर यांचा हा परंपरागत मतदारसंघ असून, ग्रामीण भागात आंबेडकरांचे मोठे समर्थक या मतदारसंघात आहेत. काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा संघ आणि विश्व हिंदू परिषदेशी असलेला आधीचा संपर्क हा आता अकोल्यात प्रचाराचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. हा प्रचार कुणाच्या पथ्यावर पडणार. हे येत्या काळात पाहावं लागणार आहे.
बच्चू कडूंचा कुणाला पाठिंबा
दुसरीकडे महायुतीशी काडीमोड घेतलेल्या आमदार बच्चू कडून यांच्या प्रहार जनशक्तीनं रामटेक आणि अकोल्यातही काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केलाय. अभय पाटील विरुद्ध वंचित असा सामना रंगणार असला तरी याचा फायदा तिरंगी लढतीत भाजपाला होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतायेत.