मुंबई : लोकसभा निवडणुकीवर वंचितला यवतमाळ -वाशिम लोकसभा (Yavatmal–Washim Lok Sabha )मतदारसंघातुन धक्का बसला आहे . या मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत राठोड (Abhijeet Rathod ) यांना निवडणूक लढण्यापासून वंचितच राहावे लागणार आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना दिलासा देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली आहे .त्यामुळे या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार नसणार आहे.त्यामुळे वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना धक्का बसला आहे . आता ते कोणाला पाठींबा देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
या मतदारसंघामध्ये दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला निवडणूक होणार आहे. यासाठी ४ एप्रिल ही नामांकनपत्र भरण्याची अंतिम तारीख होती. वंचित बहुजन आघाडीने याआधी सुभाष पवार यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यानंतर त्यांच्या जागेवर ऐनवेळी राठोड यांना उमेदवारी घोषित केली. त्यानंतर राठोड यांनी तातडीने नामांकनपत्र दाखल केले. मात्र त्यात विविध त्रुटी आढळून आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते रद्द केले. .त्यांच्या या निर्णयाविरुद्ध अभिजीत राठोड यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता निवडणुकीपासून त्यांना वंचित राहावे लागणार आहे . .
दरम्यान या मतदारसंघात महायुतीकडून खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील (Rajshri Patil)यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हेमंत पाटील यांना शिवसेनेकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध झाला. त्यामुळे पक्षाने ऐनवेळी हेमंत पाटील यांचं तिकीट कापलं. त्याऐवजी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय देशमुख (Sanjay Deshmukh)यांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे या मतदारसंघात बाजी कोण मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .