अकोला- अकोल्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सातत्यानं लक्ष्य करण्यात येतंय. काँग्रेसनं अभय पाटील यांना दिलेली उमेदवारी ही भाजपाला पूरक असल्याचा आरोप करण्यात येतोय. अशा स्थितीत पटोले यांनीही अकोला मतदारसंघात तळ ठोकून विरोधकांच्या आरोपांना प्रतिउत्तर देण्याचं ठरवलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या विजयासाठी नाना पटोले ठाण मांडून बसल्याचं सांगण्यात येतंय.
नाना पटोले विरुद्ध प्रकाश आंबेडकर
अकोला मतदारसंघात डॉ. अभय पाटील यांना काँग्रेसनं उमेदवारी दिल्यानंतर वंचितकडून गंभीर आरोप करण्यात येतायेत. पटोले हे भाजपाचे स्लीपर सेल असून विदर्भ आणि राज्यात १० पेक्षा जास्त ठिकाणी भादपासमोर पोटेंनी कमकुवत उमेदवार दिल्याचा आरोप आंबेडकरांकडून करण्यात येतोय. पटोले विरुद्ध आंबेडकर असा हा वाद निर्माण झाल्यानं आता पटोले हे अकोल्यात ठाण मांडून बसल्याचं सांगण्यात येतंय.
पटोलेंची प्रतिष्ठा पणाला
नाना पटोले यांच्यासाठी अकोला मतदारसंघात प्रतिष्ठा पणाला लागल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू आहे. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा झाल्या मात्र अपयश आले. अकोला लोकसभा मतदारसंघावर या मतदारसंघात महाविकास आघाडी उमेदवार देणार नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आंबेडकर यांनी काँग्रेसच्या दोन उमेदवारांना बिनशर्त पाठिंबाही जाहीर केला होता. त्यामुळे काँग्रेस अकोल्यात उमेदवार देणार नसल्याचं म्हटलं जात असतानाच अखेर डॉ. अभय पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आता नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे. आतापर्यंत पटोले यांनी तीन सभा घेतल्या आहेत.
हेही वाचाःप्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी राहुल गांधी सोलापूरात