Twitter : @NalavadeAnant
मुंबई
महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरणाने चांगलाच पेट घेतला आहे. अशात राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु असून आता सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांचे आरक्षणाच्या समर्थनासाठी राजीनाम्याचे सत्रही सुरु झाले आहे.
मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील भाजपाच्या आमदाराने राजीनामा दिल्याची माहिती सध्या समोर आली आहे. गेवराईचे आमदार असलेले लक्ष्मण पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. सोबतच आमदार सुरेश वरपुडकर यांनी देखील विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांच्या आमदारकीचा राजीनामा सोमवारी पाठवून दिला आहे.
यापूर्वी हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी देखील आपल्या खासदार पदाचा राजीनामा दिला होता. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी आमदार खासदारांना राजीनामा न देण्याचं आवाहन केलं होतं. पण तरी देखील खासदार – आमदारांच्या राजीनाम्याचे सत्र सुरुच आहे. त्यातच आता शिवसेना – भाजप आमदारांच्या राजीनाम्यामुळे सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात प्रामुख्याने बीड जिल्ह्यात आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आरक्षणावरून वादग्रस्त वक्तव्य केल्याने मराठा आंदोलकांनी त्यांच्या कार्यालयाची प्रचंड तोडफोड केली. तर शरद पवार गटाचे बीड शहराचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्याला आग लावून दिली. काही ठिकाणी समृद्धी हायवेवर ठाण मांडून रस्त्यावर टायर जाळून जोरदार घोषणाबाजी करत हायवेवरील वाहतूक बंद पडली.
विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनाही मराठा आंदोलनकांनी घेराव घातला आणि झिरवळ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
मराठा आंदोलनाच्या हिंसक आंदोलनाची दखल घेत, उर्वरीत महाराष्ट्रातून मराठवाड्यात जाणाऱ्या सर्व एस टी गाड्यांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय एस टी महामंडळाने जाहीर केला.
तर दुसरीकडे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिक कोकाटे यांनी व काँग्रेसने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.