Twitter: @NalavadeAnant
मुंबई: मुंबईसह ज्या – ज्या मोठ्या शहरांमध्ये गेले वर्षभर ज्या मोठ्या मनपात महापौर, लोकप्रतिनिधी, नगरसेवक नाहीत अशा सर्वच ठिकाणी फक्त आणि फक्त घोटाळ्यांचेच प्रश्न समोर येत आहेत. याला फक्त हे सत्तारूढ खोके सरकार, घटनाबाह्य सरकार जबाबदार आहे. पण आताच सांगून ठेवतो, २०२४ मध्ये आमचे सरकार येणार. त्यावेळी या घोटाळेबाजांना, मंत्र्यांना तुरुंगात टाकणार म्हणजे टाकणारच, अशी गर्जना शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे यांनी शनिवारी येथे केली.
आदित्य ठाकरे यांनी “मातोश्री” निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच निशाणा करत त्यांचा उल्लेख पुन्हा घटनाबाह्य मुख्यमंत्री असाच केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याचकडे नगरविकास खाते देखील आहे, असे सांगत आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या मुंबईत महानगरपालिकेच्या निधीतून २०२१-२२ ला तब्बल ६ हजार ५०० कोटींची रस्त्यांची व रस्त्यांवर बसविण्यात येणाऱ्या स्ट्रीट फर्निचरची कामे हाती घेण्यात आली, त्यातील एकाही कामांची पूर्तता या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी अद्याप केलेली नाही. वाहतूक पोलिसांवर दबाव आणून ते एन ओ सी देत नाही, हे कारण पुढे करुन त्यांनी वाढीव खर्च दाखवत आणि कॉन्टॅक्टर व सिंडिकेट करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करत असल्याचा गौप्यस्फोटही ठाकरे यांनी केला.
मुंबईत ६ हजार ५०० कोटींच्या निधीतून यांनी ज्या पाच कंत्राटदारांना रस्त्यांच्या कामांची पाकीट वाटली आहेत, त्यातील पूर्व उपनगरातल्या एका कंत्राटदाराचा चिपळूणमध्ये बांधत असलेला पुल अलीकडेच कोसळला. याला तब्बल एक हजार कोटी रूपयांच्या रस्त्यांच्या कामासाठी पाकिट दिलेले आहे. यात मंत्रालयातील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कोण – कोण सामील आहेत आणि कोणाचा थेट हात आहे, याचीही खोलवर चौकशी होण्याची गरज असताना यांना पाठीशी घालून खोऱ्याने पैसे खेचले जात आहे, असाही गंभीर आरोप करत आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला.
आज मुंबईत २५ वॉर्ड आहेत. पण तब्बल १५ वॉर्ड असे आहेत की जिथे वॉर्ड ऑफिसरच नाहीत. कारण तिथेही सी एम ओ मधून बोली लावली जात आहे. मुंबईतला कचरा उचलला जात नाहीय. मात्र प्रशासक घाईघाईत कामे काढत आहेत. यांनी अतिशय घाणेरड्या व प्रदूषित राजकारणाला सुरूवात केली असून २०२४ ला राज्यांत आमचे सरकार येणारं म्हणजे येणारच. आणि आल्या आल्या ज्यांनी याला सुरूवात केली आहे अशा सर्व घोटाळेबाजांना, मंत्र्यांना आम्हीं तुरुंगात टाकणार म्हणजे टाकणारच, असा निर्वाणीचा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.