Twitter @abhaykumar_d
नांदेड
मराठा आरक्षण प्रकरणी मराठवाड्यात जागोजागी आंदोलनाला हिंसक वळण मिळत आहे. बीड जिल्ह्यात दोन आमदारांच्या घरी जाळपोळ करण्यात आली तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर येथील आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाचीही संतप्त आंदोलकांनी तोडफोड केली. नांदेडमध्ये दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या घराच्या काचाही संतप्त आंदोलकांनी फोडल्या तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणा मराठा आंदोलकांनी करून त्यांच्याविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली.
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर संतप्त मराठा समाज आज घोषणाबाजी करत धावून गेला. त्या ठिकाणी संतप्त जमावाने त्यांच्या घरासमोर असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना आग लावली. त्यानंतर जमावाने त्यांच्या घराला पेटवून दिले. त्यामुळे त्या ठिकाणी वातावरण प्रक्षोभक बनले होते. बीड येथे शरद पवार गटाचे समर्थक आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला देखील संतप्त जमावाने आज आग लावली. त्या ठिकाणी मराठा आरक्षण समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. संतप्त जमावाने बीड नगरपरिषद कार्यालयालाही आज आग लावली. त्या ठिकाणी देखील उभ्या असलेल्या वाहनांना जाळण्यात आले.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयावर मराठा समाजाचे कार्यकर्ते धावून गेले. त्या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी करत तोडफोड करण्यात आली. तसेच मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन मंगळवारी करण्यात येईल, असा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
बीड येथील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा बंगला संतप्त आंदोलकांनी जाळला. तसेच राष्ट्रवादीचे कार्यालयदेखील बीडमध्ये जाळल्याने मराठवाड्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे तहसील कार्यालय परिसरात उभ्या असलेल्या तहसीलदारांच्या गाडीच्या काचा संतप्त आंदोलकांनी फोडल्या.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावत असून त्यामुळे मराठा समाज अधिक संतप्त झाला आहे. उपोषणस्थळी मनोज जरांगे पाटील हे झोपूनच असून त्यांचा एक हात शिवरायांच्या पुतळ्यावर आहे. हे चित्र मराठा समाजाला अधिक स्फूर्ती देणारे ठरत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत मराठवाड्यात मराठा बांधव आक्रमक बनत चालला आहे.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता इतरत्र सर्वच ठिकाणी एसटीची सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. संतप्त मराठा आंदोलकांनी नांदेड- हैदराबाद महामार्गावरील बिलोली रस्त्यावर आज दोन तास रस्ता रोको करून सर्वत्र वाहतूक विस्कळीत केली होती.
बीड जिल्ह्यातील गेवराईत सुरु असलेल्या उपोषण स्थळापासून काही अंतरावर राजकीय नेत्यांच्या बॅनरवर लहान मुलांना लघुशंका करायला लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. १५ ते २० जणांनी या लहान मुलांना सार्वजनिक ठिकाणी हे कृत्य करायला प्रवृत्त केल्याचा गुन्हा गेवराई पोलिसांनी दाखल केला आहे.
पोलिस हवालदार धन्यपाल प्रविण लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, दि.२९ रोजी 11.30 ते 12.30 वाजेदरम्यान गेवराई शहरातील शास्त्री चौक येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु होते. त्या ठिकाणी पोलिसांनी भेट दिली. त्यावेळी तेथे १५ ते २० जण हे मराठा आरक्षणासाठीच्या घोषणा देत होते.
दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर राजकीय नेते यांचे फोटो बॅनर तयार करून रस्त्यावर खाली अंथरले. त्यावर अर्धनग्न अवस्थेत असलेले आठ ते दहा वर्षे वयोगटातील मुलांना या राजकीय नेत्यांच्या फोटो बॅनरवर लघुशंका करण्यास प्रवृत्त केले व सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्य करण्यास भाग पाडले. याचे व्हिडीओ चित्रण व फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित केले, अशा प्रकारची तक्रार नोंदणविण्यात आली आहे.
मराठवाड्यात आरक्षणाचे आंदोलन अधिक तीव्र झाले असून जागोजागी जाळपोळ तसेच प्रचंड घोषणाबाजी सुरू आहे. मराठवाड्यातील प्रत्येक ग्रामीण भागात राजकारणी लोकांच्या बॅनर तसेच पोस्टरवर असलेल्या चेहऱ्यावर काळीमा फासण्यात येत आहे. मराठवाड्यातील सातही जिल्ह्यात एसटीची सेवा बंद पडल्याने दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तर गोरगरीब प्रवाशांसाठी असलेली दळणवळणाची सुविधा पूर्णपणे ठप्प झाली आहे.