मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत . या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )यांची परभणीत जाहीर सभा पार पडली. परभणीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांची ही सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi ) ,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधत त्यांना ओपन चॅलेंज केलं आहे .ते म्हणाले , परभणी माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मिंध्यांना असं वाटलं असेल की, सर्व काही पैशांनी विकत घेता येतं. पण परभणीकर पैशांनी विकले जाऊ शकत नाहीत. हे शिवसेना प्रमुखांनी कमवलेलं जे प्रेम आहे ते आशीर्वादाच्या रुपाने माझ्या समोर बसलं आहे. तुम्हाला या उद्धव ठाकरे संपवायचा आहे ना? हिम्मत असेल तर बघा प्रयत्न करुन अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे .
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले , आपलं जे मशाल चिन्ह आहे त्यामध्ये एक शब्द आहे, जय भवानी, जय शिवाजी, आता त्या गाण्यातला मोदी-शाहांचा जो नोकर निवडणूक आयोग आहे त्याने सांगितलं की, जय भवानी शब्द काढा. काढायचा शब्द? मी तर मोदी आणि शाह यांना सांगतो, तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र हा जय भवानी, जय शिवाजी बोलत उठाबशा काढायला सांगितल्याशिवाय राहणार नाही . तुमच्या मनात जय भवानी शब्दाबद्दल इतका द्वेष आणि आकस का आहे? दिल्लीत बसले म्हणजे आपण म्हणू तसं सगळा देश ऐकेल? ही जिवंत माणसं आहेत, गुरं-ढोरं नाहीत. अंगावर आलात प्रेमाने मिठी मारली तेव्हा आम्ही तुमची साथ दिली होती. पण पाठीत वार केला तेव्हा ही माझी वाघनखं बाहेर आलेली आहे. आम्ही वाघनखं परत आणणार. बसा. स्वत:ची नखे काढत बसा”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे . .
शिवसेनेत बंड करून आमच्याशी गद्दारी करणार्यांनी पाठीवर वार केलेत . ही आपली परीक्षा आहे. अरे वादळाला सुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहे. आम्ही पाठीवर वार करत नाहीत. आम्ही वादळाच्याही छातीवर वार करणारे शिवरायांचे मावळे आहोत असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला .