मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपावरुन महायुती आणि मविआत चुरस असल्याचं पाहायला मिळतंय. महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा अखेरच्या टप्प्यात आली असल्याचं दिसत असलं तरी महायुतीत मात्र अद्यापही यावरुन अस्वस्थता असल्याचं दिसतंय. भाजपाला लोकसभा निवडणुका महत्त्वाच्या असल्यानं राज्यात भाजपा जास्त जागा लढणार असल्याचं सांगण्यात येतंय. भाजपा ३२ जागा लढेल, अशी चर्चा आहे. असं झाल्यास शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कमी जागांवर समाधान मानावं लागणार आहे. मात्र दोन्ही पक्षांतून या जागावाटपाला विरोध होतो आहे.
शिंदेंच्या शिवसेनेतील अस्वस्थता यापूर्वीच उघड
शिंदेंच्या शिवसेनेचे १३ खासदार असतानाही त्यांना ९ ते १० जागाच मिळतील असं सांगण्यात येतंय. शिंदेंच्या शिवसेनेच्या काही जागा भाजपाच्या चिन्हावर लढवल्या जातील अशीही चर्चा आहे. त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर, नाशिक अशा मतदारसंघांचा समावेश आहे. याबाबत अस्वस्थ असलेल्या शिंदेंच्या खासदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे. शिंदेंची शिवसेना ही भाजपाच्या ताटाखालचं मांजर नाही, या शब्दात गजानन किर्तिकर यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत ठोस भूमिका घेण्याची मागणीही त्यांनी यापूर्वी केलेली होती.
अजित पवार गटही आग्रही
त्यात आता अजित पवार गटही आग्रही भूमिकेत येत असल्याचं दिसतंय. किमान १० जागा महाराष्ट्रात मिळायला हव्यात, अशी भूमिका धर्मराव बाबा अत्राम यांनी घेतलीय. विदर्भातील भंडारा-गोंदिया, अमरावती आणि गडचिरोली या तीन मतदारसंघांवरही दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळं अजित पवार गटाकडूनही जास्त जागांची मागणी होताना दिसतेय.
अमित शाहांच्या दौऱ्यात तोडगा निघणार?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा दोन दिवसांच्या मराठवाडा, खान्देश आणि विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात महायुतीतील जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल, असं सांगण्यात येतंय. अमित शाहा या दोन्ही पक्षांचं कसं समाधान करणार हे आता पहावं लागणार आहे.
हेही वाचा:मविआचं अखेर ठरलं, वंचितला लागणार लॉटरी?, काय आहे जागावाटपाचा फॉर्म्युला, घ्या जाणून