मुंबई
मराठा आरक्षणासाठी गेल्या ५ दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या धक्कादायक पोस्टमुळे मराठा बांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
आज सकाळपासून जरांगे पाटलांची प्रकृती ढासळली असून त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. मराठा बांधवांकडून त्यांना उपचार घेण्यासाठी विनंती केली जात आहे. शेवटी जरांगे पाटील उपचार घेण्यास तयार झाले आहे. दुसरीकडे नारायण राणेंच्या ट्विटरवरील पोस्टमुळे मराठा समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे.
काय म्हणाले नारायण राणे?
मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलवून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत.
नारायण राणेंच्या या पोस्टवर मराठा बांधवांकडून कडाडून विरोध केला जात आहे. राज्य सरकारने पाटलांसाठी काहीतरी करायला हवं. त्याऐवजी सरकार फोडाफोडीचं राजकारण करीत असल्याचा हल्ला मराठा बांधवांकडून केला जात आहे.