मुंबई
आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेंच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाने हा निर्णय लोकशाही विरोधी असल्याचं म्हटलं आहे. आज या प्रकरणात उद्धव ठाकरे महापरिषद घेणार आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ विधिज्ञ, राजकीय विश्लेषक देखील सहभागी होणार आहेत. या पत्रकार परिषदेनंतर सायंकाळी ५ वाजता राहुल नार्वेकर तातडीची पत्रकार परिषद घेणार आहेत.
विधान भवन येथे ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. ठाकरेंच्या महा पत्रकार परिषदेनंतर आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत नार्वेकर कोणत्या मुद्द्यावर बोलणार याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. तरी या पत्रकार परिषदेत राहुल नार्वेकर ठाकरेंनी केलेल्या आरोपावर उत्तर देतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आमदार अपात्रता निकालानंतर राहुल नार्वेकर यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. त्यांनी दिलेला निकाल हा कायद्याला धरून नसल्याचं मत अनेक कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.