मुंबई : महाविकास आघाडीतून बाहेर पडत एकला चलो रे ची भूमिका घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) दुसरी यादी जाहीर करत अकरा उमेदवारांना संधी दिली आहे . या यादीत मुळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते रमेश बारसकर(Ramesh Baraskar )यांना माढ्यातून उमेदवारी देण्यात आली आहे . त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून (Sharad Pawar group )रमेश बारसकर यांची हकाटपट्टी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीत बंड करून भाजपशी हातमिळवणी केलेल्या अजित पवारांच्या प्रवेशानंतर पक्षात फूट पडली . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर रमेश बारसकर यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. रमेश बारसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रदेश चिटणीसपदी कार्यरत होते. असे असतानाही वंचित बहुजन आघाडीने आपल्या दुसऱ्या यादीत माढा या लोकसभा मतदारसंघासाठी रमेश बारसकर यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय अलिकडच्या काळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी रमेश बारसकर यांचा संपर्क वाढल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दिले आहे.
वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागांपैकी आतापर्यंत 19 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. वंचितने लोकसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी जाहीर करताना 11 उमेदवारांना संधी दिली. हिंगोलीतून बी. डी. चव्हाण, लातूरमधून नरसिंग उदगीकर, सोलापूरमधून राहुल गायकवाड, माढातून रमेश नागनाथ बारस्कर, साताऱ्यातून मारुती जानकर, धुळ्यातून अब्दुर रेहमान, हातकंगलेमधून दादासाहेब उर्फ दादागौडा चवगोंडा पाटील, रावेरमधून संजय ब्रह्मणे, जालनातून प्रभाकर बकले, मुंबई उत्तर मध्यमधून अब्दुल हसन खान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग काका जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.यामध्ये बारसकरांना वंचितने दिलेली उमेदवारी चांगलीच भोवली आहे .