विश्लेषण ताज्या बातम्या

विजयकुमार गावित: मुंडे गटाच्या शेवटच्या समर्थकाला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा डाव?

Twitter : @vivekbhavsar

2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभर विकासाचा पर्यायाने नरेंद्र मोदी यांच्या नावाचा बोलबाला होता. गुजरात मॉडेलची चर्चा होती. 2014 पर्यंत नंदुरबारमधून फक्त काँग्रेस आणि काँग्रेसचाच खासदार निवडून जात होता. स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी यापूर्वी २००४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात जाहीरपणे सांगितले होते की ज्या दिवशी नंदुरबारमधून भाजपचा खासदार निवडून जाईल, त्या दिवशी या देशात भाजपची सत्ता येईल. प्रमोद महाजन यांची भविष्यवाणी २०१४ मध्ये खरी ठरली आणि नंदुरबारमधून भारतीय जनता पक्षाच्या डॉ हिना विजयकुमार गावित या काँग्रेसचे शक्तिशाली नेते माणिकराव गावीत यांचा पराभव करून “जायंट किलर” ठरल्या. देशात देखील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आली.

हा झाला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास. पण या निवडणुकीआधी जे घडले होते, तेही वाचकांना सांगणे आवश्यक आहे. नंदुरबार (एकत्रित धुळे जिल्हा) हा काँग्रेसचा बालेकिल्ला. बटेसिंह रघुवंशी आणि त्यांचे सुपुत्र चंद्रकांत रघुवंशी (सध्या ते शिंदे शिवसेनेत आहेत) यांचे नंदूरबारवर वर्चस्व होते. त्यांच्या विरोधात लढत देऊन डॉ विजयकुमार गावित १९९५ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले आणि तत्कालीन शिवसेना – भाजप युती सरकारमध्ये मंत्री झाले. १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन केली, काँग्रेसचे राज्यातील अनेक नेते पवार यांच्यासोबत गेले. धुळे, नंदुरबारमधील असंख्य काँग्रेस नेत्यांना पवारांनी गळ घातली, यात रोहिदास पाटील, अमरीश पटेल यांचाही समवेश होता, त्यांनी नकार देत काँग्रेसमध्ये राहणे पसंत केले, पण रघुवंशी कुटुंबाकडून होत असलेल्या राजकीय त्रासामुळे डॉ गावित यांनी पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. 

राज्यात १९९९ मध्ये सत्तांतर झाले आणि काँग्रेस – राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आले, तेव्हाही डॉ गावित यांना मंत्रिपद मिळाले. सन १९९५ पासून ते २०१४ इतका सलग काळ डॉ विजयकुमार गावित मंत्रीपदावर आहेत आणि आदिवासी विकास विभागाचे मंत्रिपद सर्वाधिक काळ भूषवणारे देखील तेच असावेत. डॉ गावित यांच्याच पहिल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात नंदुरबार या स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती झाली, दोन – तीन मतदारसंघाचा अपवाद वगळता या जिल्ह्यातून काँग्रेसचे नामोनिशान संपवून सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एकछत्री अंमल सुरू झाला. 

विकास म्हणजे काय असतो हे उच्चशिक्षित आदिवासी असूनही स्वतः ला नेता न समजता कायम कार्यकर्त्याच्या भूमिकेत वावरणाऱ्या डॉ विजयकुमार गावित यांनी सिद्ध करून दाखवले. इथेच त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी अस्वस्थ झाले. डॉ गावित यांना राजकीय दृष्ट्या संपवले नाही तर आपले अस्तित्व राहणार नाही, या भीतीने पक्षातीलच विरोधकांनी डॉ गावित यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि दुर्दैवाने त्याला राज्यातील शिर्षस्थ नेतृत्वाने हवा दिली.

पुन्हा वळूया २०१४ च्या लोकसभा निवडणुकीकडे. डॉ गावित राज्यात मंत्री होते. लोकसभा निवडणूक लागली होती. मोदी यांना केंद्रातील काँग्रेसचे सरकार उलथून टाकून भाजपची सत्ता आणायची होती. वातावरण बदलत होते. नंदुरबार या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची जबाबदारी  भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष दिवंगत पांडुरंग फुंडकर, भाजपचे फायर ब्रँड नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्यावर सोपवण्यात आली होती. मंत्री असलेल्या डॉ गावित यांना सचिवालय जिमखानाच्या बाजूला असलेल्या सुरूची इमारतीत शासकीय फ्लॅट देण्यात आला होता. हे तिन्ही नेते रात्री उशिरा खाजगी गाडीने दिवे बंद करून डॉ गावित यांना भेटायला यायचे आणि डॉ हिना गावित यांना भाजपची लोकसभा उमेदवारी द्यायची आहे, तुम्ही परवानगी द्या अशी गळ घालत असे. (यातील दोन नेते आज हयात नाहीत, पण खडसे आजही या घटनेच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब करू शकतील).

डॉ गावित तयारच नव्हते. अखेर कन्येच्या राजकीय करिअरसाठी ते तयार झाले. पण वडील राष्ट्रवादीत आणि कन्या भाजपामध्ये, यावर टीका होईल याची त्यांना कल्पना होती, यातून त्यांची घालमेल सुरू झाली आणि लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी मुलीसाठी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. असे सांगितले जाते की शरद पवार यांनी डॉ गावित यांना राजीनामा देऊ नका अशी वारंवार विनंती केली होती. 

पुढे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ गावित यांनीही भाजप प्रवेश केला आणि सलग पाचव्यांदा केली निवडून आले. (आताची ही त्यांची पाचवी टर्म आहे.) राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप – शिवसेना युतीचे सरकार आले. पण फडणवीस यांनी डॉ गावित यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले. त्याऐवजी अनुभव नसलेले मात्र “देवेंद्र कॅम्पमधील” हीच ओळख असलेले जयकुमार रावल यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश केला गेला. डॉ गावित विरोधक हीच रावल यांची ओळख असल्याने त्यांना मंत्रिपद दिली गेल्याची तक्रार गावित समर्थक आजही करतात.

२०१९ मध्ये डॉ गावित पुन्हा एकदा निवडून आले, पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आघाडीचे महविकास आघाडी सरकार आले. गेल्या वर्षी २०२२ मध्ये पुन्हा एकदा सत्तांतर झाले आणि एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आले. दिल्लीतून राज्यातील नेतृत्वाला विशेषकरून सांगण्यात आल्याने डॉ गावित यांचा मंत्रिमंडळात समावेश करून आदिवासी विकास हे खाते देण्यात आले.

दरम्यानच्या काळात, शिक्षणाचे MD असलेल्या आणि संगीत विशारद सह अन्य पदवी असलेल्या उच्च विद्याविभूषित खासदार डॉ हिना विजयकुमार गावित यांच्या भाषाप्रभुत्त्व आणि अभ्यासू वृत्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास जिंकलेला होता. वस्तू व सेवा कर बिल लोकसभेत मांडले गेले तेव्हा भाजपकडून ओपनिंग स्पीच देण्याची संधी डॉ हिना गावित यांना देण्यात आली. अगदी हल्लीच जेव्हा विरोधी पक्षाने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता तेव्हाही डॉ हिना गावित यांच्या भाषणाचे कौतुक झाले होते.

विषयांतर करून सांगतो की मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या पत्नी डॉ कुमुदिनी देखील उच्च विद्याविभूषित असून त्यांनी MSc  नंतर PhD केली. त्या सलग पाच वर्षे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. तर MBBS असलेली दुसरी कन्या सुप्रिया या नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा असून त्यादेखील उच्च विद्याविभूषित आहेत.

दरम्यान, डॉ गावित यांच्या विरोधात पक्षाचे सरचिटणीस विजय चौधरी, आमदार जयकुमार रावल, शहादा – तळोदाचे भाजप आमदार राजेश पाडवी हे जिल्ह्यात सक्रिय असून त्यांना शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांची साथ लाभते. भाजपातील हे स्थानिक नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्यामार्फत देवेंद्र फडणवीस यांचे डॉ गावित यांच्याविरोधात कान भरतात, अशी जिल्ह्यात चर्चा आहे.

मधल्या काळात राज्यात खाते बदल करण्यात येणार होते, तेव्हा कोणाला डावलायचे अशी चर्चा सुरू झाली, तेव्हा पहिले नाव डॉ विजयकुमार गावित यांचे होते. केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार करतेवेळी डॉ हिना गावित यांच्या नावाची चर्चा होती, मात्र, जिह्यातील भाजप नेत्यांनी राज्यातील शक्तिमान नेत्यामार्फत दिल्लीत डॉ गावित यांच्याबद्दल तक्रारींचे कागदपत्रे पोहोचवली, अशी जिल्ह्यात चर्चा आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीतून येवून पहिल्यांदा खासदार झालेल्या डॉ भारती पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याची चर्चा आहे.

अत्यंत महत्वाकांक्षी असलेले अजित पवार सत्तेत सहभागी झाले आणि हवे ते पालकमंत्रीपद देखील भाजपकडून हिरावून घेतले. वास्तविक नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपद डॉ गावित यांच्याचकडे आहे. या पदाच्या माध्यमांतून जिल्ह्यावर पकड असल्याने गावोगावी आणि वस्ती – पाड्यावर भाजप आणि भाजपच्या योजना पोहोचल्या. काँग्रेसला आणि (मूळ) शिवसेनेला विस्तार करता आला नाही. 

डॉ गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यात शासनाच्या माध्यमातून जवळपास १० हजार कोटी रुपयांची कामे केली आहेत. तर त्यांचे राजकीय विरोधक गिरीश महाजन यांनी २०१४-१९ या कार्यकाळात ते जलसंपदा मंत्री असताना डॉ गावीत यांच्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघात एक रुपयाही मंजूर केला नव्हता, असा दावा गावित समर्थक करतात.

दरम्यान, पालकमंत्री पदाची विभागणी करतांना भाजपाने डॉ गावित यांच्या या कार्य कर्तृत्वाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. शेजारच्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल पाटील यांच्याकडे नंदुरबारची जबाबदारी सोपवली आणि डॉ गावित यांच्याकडे भंडारा जिल्हा सोपवण्यात आला. वास्तविक नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस संपलेली आहे, डॉ गावित यांनीच ती संपवली. अशावेळी अनिल पाटील यांच्याकडे नंदुरबार जिल्हा देण्याचे कारण काय? अजित पवार यांचा हेतू काय आहे? त्यांना भाजप संपवायची आहे की प्रदेश भाजपलाच नकोसे झाले आहेत?

असे सांगितले जाते की, मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी डॉ गावित यांना तीन वेळा बाजूला एकांतात घेऊन “अजित पवार ऐकत नाहीत, त्यांना नंदुरबार हवे आहे,” असे सांगितले. डॉ गावित यांनी पक्ष नेतृत्वाचा आदेश ऐकला आणि अनिल पाटील यांच्यासाठी नंदुरबार सोडले. डॉ गावित यांनी शिस्त पाळून  एक धडा घालून दिला, पण यातून काही प्रश्न उभे राहिले आहेत.

१. अजित पवार हे इतके पॉवरफुल नेते झाले आहेत का की ते देवेंद्र फडणवीस यांना ही ऐकेनासे झाले आहेत? हे केवळ तेव्हाच होवू शकते जेव्हा अमित शहा यांचा अजित पवार यांच्या डोक्यावर हात आहे आणि शहा यांनी फडणवीस यांच्या डोक्यावरून हात काढून घेतला आहे (अर्थात तो २०१४ पासून नाहीये). 

२. मुंडे – महाजन समर्थक खडसे, पंकजा मुंडे, राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे (शेवटच्या तिघांचे नंतर राजकीय पुनर्वसन करण्यात आले) यांना राजकीयदृष्ट्या संपवले, तसे मुंडे – खडसे यांच्यामुळे भाजपात आलेल्या डॉ विजयकुमार गावित यांना संपवायचे आहे का? 

भाजपसाठी एकेक जागा महत्वाची आहे. अशा वेळी त्यांना ताकही फुंकून पिण्याची गरज आहे. स्थानिक नेत्यांच्या कान भरणीला बळी पडून

नंदुरबारमधून डॉ गावित किंवा खासदार डॉ गावित यांचे खाच्चिकरण केल्यास भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकेल.

– विवेक भावसार

संपादक,

राजकारण

Cell – 9930403073

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
विश्लेषण महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नवाबांसाठी अजित पवारच (म)मालिक?

@vivekbhavsar मुंबई मनी लॉन्ड्रीग आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी असलेल्या कथित संबंधामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी