सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. आज (22 एप्रिल) तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला, आणि अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. विशाल पाटील लिफाफा चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. यादरम्यान पत्रकार परिषदेत विशाल पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
काँग्रेसने एबी फॉर्म द्यावा अशी अपेक्षा होती. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म आला नाही. मी मविआचा अधिकृत उमेदवार होईल अशी अपेक्षा होती. मी अर्ज मागे घ्यावा यासाठी अनेकांचे फोन आले. अनेकांनी मला पदांची प्रलोभनं दिली. मात्र माझी उमेदवारी जनतेची आहे म्हणत विशाल पाटील यांनी मविआचे चंद्रहार पाटील आणि महायुतीचे संजयकाका पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे.
काँग्रेसचा कार्यकर्ता माझ्या पाठिशी असल्याचा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे चिन्ह हद्दपार करण्याचं काम काहींनी केलं. मात्र सांगलीचा खासदार हा सांगलीकरच ठरवतील. त्यामुळे ही निवडणूक दोघांमध्येच होणार असल्याचं पाटलांनी सांगितलं. ही लढत विशाल पाटील विरूद्ध संजयकाका यांच्यामध्ये होणार असल्याचं विशाल पाटील यांनी सांगितलं.