नवी दिल्ली : गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार मुकेश दलाल सोमवारी (22 एप्रिल) बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र आता काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी भाजप उमेदवाराच्या विजयावर सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी या यशाची तुलना हुकूमशाहीशी केली आहे.
राहुल गांधी यांनी एक्सवर लिहिलं की, हुकूमशाहीचा खरा चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला आहे. जनतेकडून आपल्या नेत्याची निवड करण्याचा अधिकार हिरावून घेणं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान संपवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की, ही निवडणूक केवळ सरकार निवडण्याची नाही तर संविधानाची रक्षा करण्यासाठीची निवडणूक आहे.
जयराम रमेश यांचा भाजपवर हल्लाबोल
काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी सूरत मतदारसंघावर भाजपला मिळालेल्या विजयामागे एक क्रोनोलॉजीच्या माध्यमातून समजावलं. ते म्हणाले, लोकशाही धोक्यात आहे. तुम्ही क्रोनोलॉजी समजून घ्या. सूरत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सूरत लोकसभेतून काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे. यामागे तीन प्रस्तावकांच्या स्वाक्षऱ्यांच्या पडताळणीतील त्रुटी असल्याचे कारण देण्यात आले आहे. अशीच कारणं सांगून अधिकाऱ्यांनी सुरतमधील काँग्रेसचे पर्यायी उमेदवार सुरेश पडसाळ यांचा अर्ज नाकारला. काँग्रेस पक्ष उमेदवारविना उरला आहे. मतदानाच्या दोन आठवड्यांपूर्वी २२ एप्रिल २०२४ मध्ये सूरत लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार यांना बिनविरोध निवडून देण्यात आलं आहे.
https://twitter.com/Jairam_Ramesh/status/1782356812664377647/history
पंतप्रधान मोदींच्या अन्यायाच्या काळात एमएसएमई मालक आणि व्यावसायिकांच्या समस्या आणि संताप पाहून भाजप इतका घाबरला आहे की, सुरत लोकसभेची ‘मॅच फिक्स’ करण्याचा प्रयत्न करीत आहे. 1984 च्या लोकसभा निवडणुकीपासून ते सातत्याने या जागेवर विजय मिळवत आहेत. आपली निवडणूक, आपली लोकशाही, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सर्व धोक्यात आहे. त्यामुळे आपल्या जीवनातील ही महत्त्वपूर्ण निवडणूक असल्याचं त्यांनी सांगितलं.