कोलकत्ता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे, या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत. वर्धमानमधील एक बैठक संपवून त्या परतत असताना हा अपघात झाला. अचानक ब्रेक लागल्यामुळे त्यांच्या कपाळाला जखम झाली आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गाडी जलद गतीने जात होती. यादरम्यान रस्त्यात आलेल्या अडथळ्यामुळे चालकाने ब्रेक दाबला. अचानक ब्रेक लावल्यामुळे गाडीत बसलेले पुढे ढकलले गेले. यात ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर जखम झाली आहे.
वर्धमान जिल्ह्यातील सार्वजनिक सेवा वितरण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर त्या हेलिकॉप्टरने कोलकत्त्याला परतणार होत्या, मात्र वातावरण अनुकूल नसल्याने त्यांना रस्ते मार्गाने प्रवास करावा लागला. यादरम्यान त्यांचा अपघात झाला.
अपघाताच्या काही तासांपूर्वीच ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीतून फारकत घेत स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. काँग्रेससोबत जागावाटपाच्या प्रश्नाचं निरसन न झाल्याने ममता बॅनर्जींनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. हा इंडिया आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.