महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज ठाकरेंच्या बिनशर्तमध्ये, दडला विधानसभेचा गर्भित अर्थ

X: @ajaaysaroj

मुंबई: मनसेची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित घोषणा अखेर एकदाची अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. महायुतीला नव्हे तर नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देऊन राज्यभर असणाऱ्या आणि शिवतीर्थावर कानात प्राण आणून बसलेल्या मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचा आदेश त्यांनी काल दिला. मला राज्यसभा, विधानपरिषद काहीही नको, लोकसभाही तुम्हीच लढवा, खंबीर नेतृत्व देशात असावे म्हणून फक्त मोदींना पाठिंबा देत आहे असे ते म्हणाले. थोडक्यात लोकसभेच्या नाही, तर आता विधानसभेच्या जागावाटपात राज आपले रंग व खरे अस्त्र बाहेर काढतील असा याचा गर्भित अर्थ आहे हे स्पष्ट झाले.

सर्वात प्रथम आपणच पंतप्रधान म्हणून मोदी दिल्लीत असायला हवेत हे जाहीरपणे बोललो होतो याची आठवण राज यांनी करून दिली. लाव रे तो व्हिडीओबाबत बोलताना, ज्याच्यावर आपलं जास्त प्रेम असते, जास्त अपेक्षा असते त्यांच्याबाबतच आपण रागाने पोटतिडकीने बोलतो, त्यामुळे जे निर्णय पटले नाहीत त्याबद्दल आपण बोललो आणि यापुढेही पटले नाहीत तर माझे तोंड परत उघडेल असे सांगायलाही ते विसरले नाहीत. अनेकांना राज यांचा निर्णय पटलेला नाही, मात्र महायुतीच्या सर्वच नेत्यांनी निर्णयाचे तोंडभरून स्वागत केले आहे. लोकांमध्ये देखील संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला येत आहेत. भाजप समर्थकांनी राज यांच्या निर्णयाचे खुल्या मनाने स्वागत केले आहे. मात्र भाजपची निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय असलेली काही मंडळी राज आणि मनसेची सोशल मीडियावर खिल्ली उडवत आहेत. ज्यांना भाजपकडून विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका, आणि इतर पंचायत समित्या, जिल्हा परिषदा अशा निवडणुका भावी काळात लढवायच्या आहेत त्यातले बहुतांश नाराज आहेत. ही नाराजी मनसेबरोबर आली त्याची नाहीये, त्यांची पोटदुखी वेगळीच आहे. त्या त्या वॉर्डात, मतदार संघात आपल्याला एक प्रतिस्पर्धी जागावाटप आणि तिकीट मिळवण्यापासूनच निर्माण झाल्याची ही सार्थ भीती आहे, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. आधीच शिवसेना, त्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी असे सगळेच आले असल्याने, निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळी वाटण्या जास्त होणार आहेत, त्यात आता मनसे आल्याने एक तीळ किती जणांनी वाटून खायचा, तसे एक जागा किती जणांनी वाटून लढवायची असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना सतावत आहे. मोदींना पंतप्रधान करायच, चारसौ पार जायचे हे सगळं नेत्यांना बोलायला ठीक आहे, पण स्वतःच्या राजकीय भवितव्याचे काय करायचे हा प्रश्न कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना प्रकर्षाने जाणवतोय.

मनसैनिक देखील जो निवडणुका लढवू इच्छितो त्यालाही हीच भीती आहे. वाटेकरी वाढले तर जागावाटपात आपल्या पदरात काय पडेल हा त्याच्यासमोर प्रश्न आहे. त्यामुळे असे काहीजण नाराज होतील हे राज जाणतात. हीच सर्वात मोठी गोम आहे याची जाणीव राज यांना असल्याने, त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामधील स्फुल्लिंग यापुढेही चेतवलेले राहावे यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आत्तापासूनच लागा असे स्पष्ट आदेश दिले आहेत. बरं एवढे सांगूनच ते थांबले नाहीत, तर आपण स्वतः लवकरच महाराष्ट्रात दौऱ्यावर बाहेर पडणार आहोत असे सूतोवाच देखील त्यांनी काल शिवतीर्थावर केले आहे. मनसेला थेट महायुतीमध्ये बरोबर घेतले, व त्यांना एखाद दुसरी जागा लोकसभेत सोडली तर उत्तर भारतात देखील याचे परिणाम भोगावे लागतील अशी भीती भाजप नेत्यांना होती. बिहार आणि यू पी मधील दोन बड्या नेत्यांनी तर पत्रकार परिषद घेऊन भाजपचा प्रांत आणि भाषावादी चेहरा जनतेसमोर आणायची तयारी देखील केली आहे असे सांगितले जाते. त्यातच मुंबईमध्ये कार्यरत असणारी उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांनी तर थेट भाजपवर बहिष्कार टाकण्याचाच इशारा दिल्याने लोकसभा निवडणुकीत मनसे अगदी थेट बरोबर नको असा सावध पवित्रा भाजपने घेतला असल्याचे बोलले जात आहे.

मनसेला देखील विधानसभेच्या रिंगणात जास्त रस आहे. २००९ मध्ये त्यांचे तब्बल १३ आमदार विधानसभेत निवडून आले होते. तेव्हा शिवसेना सोडून राज बाहेर आले होते, त्यांनी काही वर्षांपूर्वीच स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. तरी देखील पहिल्याच लढाईत ते एवढया मोठ्या संख्येने विजय प्राप्त करू शकले होते. आजची परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेत उभी फूट पडली आहे. काँग्रेस आणि शरद पवार यांची कास केवळ मुख्यमंत्री पद स्वतःला मिळावे म्हणून उद्धव ठाकरे यांनी धरली, हिंदुत्वाची कास सोडली, ज्या मुस्लिम धार्जिण्या काँग्रेस आणि सोनिया गांधींबद्दल खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जाहीर विरोधात बोलायचे, माझी शिवसेना बंद करेन पण काँग्रेस बरोबर जाणार नाही असे ठणकावून सांगायचे, त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आता उद्धव ठाकरे बसायला लागले आहेत, असे चित्र संपूर्ण राज्यात उभे करून एकनाथ शिंदे आणि सहकारी बंड करून बाहेर पडले. भाजप बरोबर असलेली हिंदुत्वाची नैसर्गिक युती सोडून, लांगुलचालन करण्यात ज्या पक्षाची हयात गेली अशी काँग्रेस सत्तेसाठी जवळ केली असा ठपका उद्धव यांच्यावर ठेऊन एकनाथ शिंदे ४० आमदार, १३ खासदार आणि असंख्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते घेऊन भाजप बरोबर गेले.

आता या सगळ्या बरोबर आलेल्या आमदार, लोकप्रतिनिधींना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी हवी आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे अजित पवार आणि त्यांचेही तितकेच आमदार आणि लोकप्रतिनिधी सत्तेत आले आहेत. येणाऱ्या सर्वच निवडणुकांच्या जागावाटपात यांनाही उमेदवारीची अपेक्षा आपल्या पक्षाकडून असणारच आहे. वाटेकरी वाढले की मिळणारा वाटा कमी कमी होत जातो हे साधे गणित या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे सर्वात जास्त नाराज कोण असेल तर तो भाजपमधला पद मिळवू पाहणारा, निवडणुकीत उभा राहू इच्छिणारा कार्यकर्ता आहे. जो कार्यकर्ता फक्त आपल्या पक्षाला सर्वोच्च स्थानी बघू इच्छितो त्याला त्यासाठी राजकारणात केल्या जाणाऱ्या इलेक्टोरल तडजोडी मान्य आहेत. आपला पक्ष सत्तेवर येण्यासाठी त्याने, एकनाथ शिंदे, अजित दादा आणि राज ठाकरे यांना बरोबर घेतले तरी त्याची हरकत नाहीये. हीच बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये देखील आहे. जो फक्त राज ठाकरे आणि मनसेला सत्तेच्या जवळ जाताना बघू इच्छितो आहे त्याला राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेला पाठिंबा हा सत्तेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल वाटत आहे. येणाऱ्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कल्याण डोंबिवली, वाशी आणि अशा अनेक महानगरपालिका, नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्था इथे निवडणुका येणाऱ्या काळात होणार आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा नको, विधानसभेच्या तयारीला लागा असे सांगितले आहे त्यामध्ये विधानसभेसह इतर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अभिप्रेत आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात दौऱ्यावर ते लवकरच बाहेर पडणार आहेत. कुठल्याही राजकीय दौऱ्यासाठी, त्याच्या पूर्वतयारीसाठी, आणि प्रत्यक्ष दौऱ्यावर असताना आर्थिक गणित जुळवावी लागतात, ती नीट जमली तरच पुढील राजकीय गणितं जमतात. ही गणितं कशी जमणार आहेत, कशी जमवली जाणार आहेत, कोण जमवणार आहे, त्याचीच शर्त भाजपला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यात लपली आहे. लोकसभेत दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याचे मूर्त स्वरूप जसेजसे प्रत्यक्ष दिसायला लागेल तसतसे दौऱ्याच्या, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या इतर शर्ती मनसेसाठी पूर्ण होताना दिसतील. येणारा काळ हा निवडणुकांचा आहे, लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्वच निवडणुका येऊ घातल्या आहेत. आज लोकसभेला बिनशर्त दिलेल्या पाठिंब्यातील सुप्त शर्ती विधानसभा व इतर निवडणुकीच्या तोंडावर कदाचित समोर येतील.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात