मुंबई- राज ठाकरे आणि अमित शाहा यांच्या भेटीत अशी कोणती फाईल राज यांना दाखवण्यात आली की त्यामुळं मुंबईत त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे गेले, तसंच काही या प्रकरणात नाही ना, असा संशय राऊत यांनी व्यक्त केलाय. एका अर्थी थेट पाठिंबा देऊन राज यांनी चांगलंच केलं, अन्यथा उमेदवार उभे करुन उमेदवार पाडण्याचा प्रयत्न झाला नाही, असंही राऊत म्हणालेत.
राज्यात सुरु असलेल्या खोक्याच्या राजकारणाचे सूत्रधार हे मोदी आणि शाहा आहेत, असं राऊत म्हणालेत. राज्यातील रोजगार, उद्योग पळवण्यात येतायेत, मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न होतोय. अशा वेळी राज्याच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला पक्ष शत्रूंना पाठइंबा देत असेल तर जनतेच्या मनात शंका उपस्थित होतात. याचं उत्तर राज ठाकरेंना द्यायचं आहे. असं काय घडलं की अचानक शत्रूंना पाठिंबा द्यावासा वाटला. मनसेचा नमोनिर्माण पक्ष का झाला, का गरज पडली, हे राज ठाकरे यांना सांगावं लागणार आहे.
राज्याच्या अस्मितेसाठी आणि स्वाभिमानासाठी ठाकरेंची शिवसेना लढते आहे. आम्ही शरणागती पत्करलेली नाही. कधीही स्वार्थासाठी भाजपासोबत राहिलेलो नाही, असंही राऊत यांनी स्पष्ट केलंय. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये यासाठी केलेली ती युती होती, ती २५ वर्ष चालली. भाजपानं जेव्हा खरे दात दाखवायला सुरुवात केली, तेव्हा आम्हीच जबडा फाडून बाहेर आलो. स्वतंत्र भूमिका घेतल्या. ठाकरेंची भूमिका स्पष्ट आहे.