मुंबई : राज्यासह देशभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच आता सुरूवातीपासून चर्चेत असलेला बारामती मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ( Baramati Lok Sabha Constituency ) उमेदवारांना निवडणूक चिन्हं बहाल करण्यात आली. या चिन्ह वाटपात शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. तर दुसऱ्या एका उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यावरून शरद पवार पक्षाने नाराजी व्यक्त केली असून त्यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे . आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सात मे ला मतदान होणार आहे. बारामतीत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची 20 एप्रिलला छाननी झाली. त्यामध्ये पाच अर्ज बाद करण्यात आले असून 46 अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बारामती मतदारसंघातून 38 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या 38 उमेदवारांना सोमवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले. या मतदारसंघात सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे ‘तुतारी’ हे चिन्ह दुसऱ्या उमेदवारास दिल्यास मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून याबाबत आक्षेप घेण्यात आला असून आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे .
या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) रिंगणात आहेत तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)रिंगणात आहेत . आता यामध्ये नवीन तुतारीची एन्ट्री झाली असल्याने यात कोणाची वर्णी लागणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहेत .