मुंबई
महाराष्ट्रातील क्रमांक एकचा मतदारसंघ अशी शासकीय दप्तरी नोंद असलेल्या नंदुरबार या आदिवासी मतदारसंघातून (Nandurbar, Tribal Lok Sabha constituency) प्रचाराची सुरुवात करणाऱ्या दिवंगत इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या पाठीशी इथला आदिवासी कायम उभा राहिला. नंदुरबार मधून प्रचाराची सुरुवात म्हणजे देशात काँग्रेस चे सरकार येणार असे समीकरण तयार झालं होते. या समाजाने सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यातही इंदिरा माय बघितली आणि काल परवा प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यातही त्यांना तीच इंदिरा माय दिसली. गावित कुटुंबाच्या घराणेशाहीला आणि अरेरावीची कंटाळलेला हा आदिवासी समाज पुन्हा एकदा काँग्रेस मागे उभा राहतो का याचा फैसला आज होणार आहे.
वडील राज्यात मंत्री, मोठी मुलगी केंद्रात खासदार, लहान मुलगी जिल्हा परिषदेची अध्यक्ष, या मुलींची आई जिल्हा परिषद सदस्य असे सगळे पदे एकाच कुटुंबात वाटण्यात आल्याने विजयकुमार गावित यांनी जिल्ह्यात असंख्य विरोधक निर्माण केले आहेत. तशात दोन्ही मुलींची अरेरावी हा जिल्हा नाईलाजाने सोसतो आहे.
जिल्ह्यात या कुटुंबाने मोठ्या प्रमाणात शासकीय निधी आणला. मात्र ही कामे देतानाही आपल्याच खास कंत्राटदारांचे भले कसे होईल याचीच काळजी या गावित कुटुंबाने घेतल्याचा आरोप झाला. अगदी काकाने काम मागितले तरी मिठाई द्यावीच लागेल, असे स्पष्टपणे सांगितले जाते, अशा तक्रारी केल्या जातात. 10 टक्के, 15 टक्के, 20 टक्के अशी टक्केवारी या जिल्ह्यात रुजली आहे आणि त्यामुळे संपूर्ण गावित कुटुंब बदनाम झाल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या विजयकुमार गावित यांनी जिल्ह्यात अन्य नेत्यांशी जुळवून न घेतल्याने जयकुमार रावल, अमरीश पटेल यासारखे मातब्बर नेते गावित यांच्या विरोधात गेले. नंदुरबारचे शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी आणि काँग्रेसचे के सी पाडवी हे गवितांचे पारंपरिक विरोधक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गावित कुटुंब एकाकी पडले आहे.
या आदिवासी जिल्ह्यात ज्या आदिवासींनी धर्मांतर केले त्यांचे आरक्षण काढून घ्या या मागणीसाठी भाजपच्या अंगीकृत संघटना असलेल्या वनवासी कल्याण आश्रम आणि अन्य संस्थांनी नंदुरबार जिल्ह्यात मोर्चे काढले होते. भाजप सरकार पुन्हा सत्तेत आले तर आपले आरक्षण जाईल या भीतीने बिथरलेला आदिवासी समाज आज हिना गावित यांच्या विरोधात ठामपणे उभा आहे. याचा फटका डॉ हिना आणि पर्यायाने भाजपाला बसू शकेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर सुरुवातीला चर्चेतही नसलेले काँग्रेसचे उमेदवार ॲड गोवाल पाडवी यांनी हळूहळू मतदारांवर पकड मिळवली. वातावरण बदलत गेले आणि प्रियांका गांधी यांच्या सभेने त्यावर कळस चढवला असे म्हटल्यास वावगे होणार नाही.