मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अमित शाहा यांची काही दिवसांपूर्वी दिल्लीत भेट घेतल्यानंतर, राज ठाकरे आज महायुतीसोबत जाणार का, याचा निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळं राज ठाकरे आज शिवाजी पार्कवर काय बोलणार याकडं सगळ्यांचं लक्ष असेल. शिवाजी पार्कच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आलीय.
70 हजार खुर्च्यांची व्यवस्था
या सभेला महाराष्ट्रभरातून मनसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्यासाठी 70 हजार खुर्च्यांची व्यवस्था शिवाजी पार्कात करण्यात आलेली आहे. मंचावर राज ठाकरे आणि इतर पदाधिकारी यांच्यासाठी 30 खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत. संध्याकाळी साडे सातच्या सुमारास राज ठाकरेंचं मुख्य भाषण होईल त्यापूर्वी मनसेच्या सहा ते सात नेत्यांची भाषणं होण्याची शक्यता आहे.
या सभेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. ३५ पोलीस अधिकारी सुरक्षेसाठी तैनात असतील. तसंच १०० मनसेचे सुरक्षा रक्षकही असणार आहेत.
राज ठाकरेंकडून शिवतीर्थावर येण्याचं आवाहन
राज ठाकरेंच्या सभेचे तीन ते चार टिझर आत्तापर्यंत समोर आलेले आहेत. यात शिवाजी पार्कवर आपली भूमिका मांडणार असल्याचं सांगत, शिवतीर्थावर येण्याचं आवाहन राज ठाकरे करताना दिसतायेत. आता राज ठाकरे काय भूमिका घेणार आणि त्याचे राजकारणात काय पडसाद उमटणार हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचाःनाशिकचा फटका साताऱ्याला, महायुतीत तीन जागांचा तिढा अद्यापही कायम, कधी सुटणार पेच?