मुंबई- महाविकास आघाडीतील सांगली, भिवंडीचा तिढा सुटताना दिसत नाहीये. सांगलीतून उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची केलेली घोषणा राज्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या जिव्हारी लागलेली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या तिकिटावर ही निवडणूक लढवावी अशी जिल्ह्यातील आणि राज्यातील नेत्यांची इच्छा होती. यावरुन मविआत वादंग निर्माण झालेला आहे. गुढीपाडव्याला आज मविआतील तिन्ही पक्ष एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र त्याच्या आधी काही तासांपर्यंत ही नाराजी कायम आहे. अशात सोनिया गांधी यात लक्ष घातलंय.
सांगलीच्या जागेसाठी सोनिया गांधीही आग्रही
विशाल पाटील यांना सांगलीतून काँग्रेसची उमेदवारी मिळावी, यासाठी सोनिया गांधीही आग्रही आहेत. त्यांनी याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं सांगलीऐवजी जालन्याची जागा लढवावी, अशी मध्यस्थीचा निरोप सोनियांनी पाठवलेला आहे. शरद पवार यांच्याकडे हा निरोप पाठवण्यात आला असून, आता पवार काय करणार हे पहावं लागणार आहे. ही मध्यस्थी यशस्वी झाल्यास भिवंडीच्या जागेवर असलेला काँग्रेसचा विरोध मागे घेण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. आता याबाबत ठाकरे, पवार आणि खर्गे यांच्यात चर्चा होणार असून त्यातून काय निष्पन्न होतं ते पाहावं लागणार आहे.
सांगलीच्या जागेसाठी का चुरस
सांगलीची जागा ही परंपरागत काँग्रेसची जागा असल्यानं काँग्रेसकडून या जागेवर दावा सांगण्यात येतोय. विश्वजीत कदम हे याजागेसाठी आग्रही आहेत. तर कोल्हापूरची जागा शाहू छत्रपतींसाठी काँग्रेसला सोडल्यानं पश्चिम महाराष्ट्रात एकही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे नसेल अशी शक्यता होती. हातकणंगलेच्या जागी काही दिवसांपूर्वी पर्यंत राजू शेट्टींना मविआ पाठिंबा देणार होती, मात्र आता ठाकरे गटानं त्या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे. अशात ठाकरे सांगलीबाबत माघार घेणार का, हे पाहावं लागणार आहे.
हेही वाचाःकाँग्रेसने देशाला खड्ड्यात घालण्याचं काम केलंय ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा घणाघात