मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे . आज चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी काँग्रेसने (Congress) प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली आहे . ‘काँग्रेसने ५० वर्षांच्या काळात जेवढी कामं झाली नाहीत. तेवढी कामं मोदींच्या काळात झाली हा इतिहास जनतेसमोर ताजा आहे. त्यांनी जाहीरनामा जाहीर केलाय पण त्यांच्याकडे ५० वर्षांचा हिशोब मागायला हवा, ५० वर्षात तुम्ही देशाला कुठे घेऊन गेलाय. आज त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा अधिकार नाही, त्यांनी माफीनामा जाहीर करायला हवा होता. कारण त्यांनी देशाला खड्ड्यात खालण्याचं काम केलंय.’ असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर चढवला आहे .
या लोकसभेत आमचाच विजय होणार असून देशात पुन्हा मोदी सरकार येणार ही गॅरंटी १४० कोटी देशवाशीयांनी घेतली आहे. आज देशामध्ये मोदींची गॅरंटी चालते. मात्र, इतर लोकांच्या गॅरंटीवर कोणाचाही भरवसा नाही. काँग्रेसचे सरकार असताना आपला देश कोणत्या परिस्थितीत होता हे सर्वांना माहिती आहे. दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट, दंगली, भ्रष्ट्राचार, अशा अनेक गोष्टींनी आपला देश ग्रासला होता. पण गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशात विकास होत आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे . ते म्हणाले , सूर्य, चंद्र आहे तोपर्यंत आमची शक्ती कोणी संपवू शकत नाही. हिंदू धर्मातील शक्तीला संपवण्याचं राहुल गांधींचं स्वप्न धुळीला मिळेल, असं त्यांनी म्हटलं आहे .
दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयाची गुढी आपल्याला नक्कीच उभारायची आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी नक्कीच हॅट्रीक करतील. ४ जूनला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर असाच जल्लोष आपल्याला करायचा आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत .