महाराष्ट्र ताज्या बातम्या

७/१२ उताऱ्यात विकास करारनाम्याची नोंद अनिवार्य करण्याची मागणी; भविष्यातील जमीन वाद टाळण्यासाठी ग्राहक भारतीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Buyer and revenue officials verifying Maharashtra 7/12 land records and a registered development agreement.

मुंबई : महाराष्ट्रातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि भविष्यात उद्भवणारे न्यायालयीन वाद टाळण्यासाठी ७/१२ उताऱ्यातील “इतर अधिकार” या स्तंभामध्ये नोंदणीकृत विकास करारनाम्याची (Registered Development Agreement) नोंद अनिवार्य करण्याची मागणी ग्राहक भारती (कौन्सिल फॉर प्रोटेक्शन ऑफ राईट्स) या संस्थेने केली आहे.

संस्थेचे अध्यक्ष बॅरिस्टर विनोद तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे मुख्य सचिव यांना निवेदन देऊन यासंदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार आवश्यक आदेश काढण्याची विनंती केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या ७/१२ उताऱ्यातील “इतर अधिकार” या स्तंभात बँकेचे कर्ज, भाडेकरार, सरकारी बोजा तसेच इतर काही अटींची नोंद केली जाते. मात्र संबंधित जमिनीवर नोंदणीकृत विकास करारनामा अस्तित्वात असला तरी त्याची नोंद महसूल अभिलेखात होत नाही. त्यामुळे त्या जमिनीबाबत सर्वसामान्य नागरिक किंवा संभाव्य खरेदीदारांना महत्त्वाची माहिती उपलब्ध होत नाही.

तिवारी यांनी निवेदनात म्हटले आहे की, काही प्रकरणांमध्ये जमीनमालक विकासकासोबत विकास करारनामा करून त्यानंतर त्याच जमिनीची विक्री अन्य व्यक्तींना करतात. अशा व्यवहारांमुळे विकासक, खरेदीदार आणि जमीनमालक यांच्यात दीर्घकाळ न्यायालयीन वाद निर्माण होतात.

त्यांच्या मते, ७/१२ उताऱ्यावर नोंदणीकृत विकास करारनाम्याची नोंद झाल्यास कोणत्याही जमिनीवरील विकास हक्कांविषयीची माहिती सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध होईल. त्यामुळे व्यवहारातील पारदर्शकता वाढेल, दुहेरी व्यवहारांना आळा बसेल आणि भविष्यातील न्यायालयीन वाद मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

ग्राहक भारतीने राज्य सरकारला महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार आवश्यक प्रशासकीय आदेश काढून ७/१२ उताऱ्यातील “इतर अधिकार” स्तंभात नोंदणीकृत विकास करारनाम्याची नोंद अनिवार्य करण्याची मागणी केली आहे.

राज्य सरकार या मागणीवर कोणती भूमिका घेते, याकडे महसूल क्षेत्र, रिअल इस्टेट उद्योग तसेच जमीन व्यवहाराशी संबंधित सर्व घटकांचे लक्ष लागले आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात