मुंबई : महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून चर्चा सुरू असतानाही ठाकरे गटाकडून या मतदारसंघात उमेदवारी घोषीत केल्यामुळे महाविकास आघाडीत वादंग निर्माण झाला आहे. दुसरीकडे ठाकरे गटही आपल्या उमेदवारावर ठाम असल्याने काँग्रेसने ‘मैत्रीपूर्ण लढाई’ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणायला ही लढाई मैत्रीपूर्ण वाटत असली तरी प्रत्यक्षात दोन्हीही पक्ष आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने पुन्हा मतांच्या विभाजनाला आणि परिणामी पराभवाचाही सामना करावा लागू शकतो, असंच काहीचं चित्र आहे.
महाविकास आघाडीत दक्षिण मध्य मुंबई, सांगली, भिवंडी, रामटेक या जागांवरुन तणाव निर्माण झाला होता. मात्र ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघात अधिकृत उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली. महाराष्ट्रातील सांगली, भिवंडी, उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या लोकसभेच्या जागा काँग्रेसला सोडण्यास आघाडीतील मित्रपक्षांनी नकार दिला, तर इंडिया आघाडीतील घटकपक्षांविरुद्ध मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसला हायकमांडने हिरवा कंदील दाखवला आहे.
आज काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान यांनी याबाबत खुलासा केला. ते म्हणाले, याबाबत दिल्ली हायकमांडशी बोलणं झालं असून या जागांवर काँग्रेसचाही उमेदवार निवडणूक लढवणार ही निश्चित झालेलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष एकमेकांविरुद्ध लढले, तर मतविभाजन होऊन त्याचा फटका महायुतीला होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे नेते यावर तोडगा काढून कुठला सुवर्णमध्य काढणार का, किंवा ठाकरे गटाने जाहीर केलेल्या सांगली, उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या जागा काँग्रेसला सोडल्या जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.