X: @therajkaran
यवतमाळ – वाशिममध्ये हेमंत पाटलांच्या पत्नीला उमेदवारी
नांदेड: भाजपच्या दबावामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांच्या गटाचे उमेदवार आणि हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांची याआधी जाहीर केलेली उमेदवारी रद्द केली आहे. त्यांच्या जागी हिंगोली जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तळणी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव कदम कोहळीकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
हेमंत पाटील यांची उमेदवारी आठ दिवसांपूर्वीच जाहीर झाली होती. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांनी त्यांच्या नावाला विरोध केला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापर्यंत आमदारांचे शिष्टमंडळ गेल्यामुळे भाजपच्या (BJP) दबावाखातर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंगोली लोकसभेचा (Hingoli Lok Sabha) उमेदवार बदलून द्यावा लागला.
दरम्यान, यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत हिमायतनगर- हदगाव मतदार संघातून बाबुराव कदम कोहळीकर दुसऱ्या क्रमांकावर आले होते. उमेदवारी रद्द झालेल्या हेमंत पाटील यांची पत्नी राजश्री हेमंत पाटील यांना यवतमाळ- वाशिम लोकसभेची (Yavatmal – Washim Lok Sabha) उमेदवारी जाहीर झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात असलेल्या सारंगपूर येथील त्या मूळ रहिवासी आहेत. वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना सलग चौथ्या वेळी उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर हेमंत पाटील यांच्या पत्नीची लॉटरी लागली आहे. भावना गवळी यांना उमेदवारी देऊ नये यासाठीही भाजपचा आग्रह होता.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर करून ती रद्द करण्यात आल्याने हेमंत पाटील समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दोन दिवसांपूर्वी हेमंत पाटील यांच्या समर्थकांनी हिंगोलीतून आमच्या नेत्याचे तिकीट नाकारल्यास आम्ही त्याचा वचपा नांदेड लोकसभा निवडणुकीत काढू व आघाडी धर्म न पाळणाऱ्या भाजपला धडा शिकवू असा इशारा दिला होता. मात्र, पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने हेच समर्थक आता कोणती भूमिका घेतात याकडे हिंगोलीतील त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.