मुंबई– नरेंद्र मोदी यांचं सरकार २०१४ साली सत्तेत आल्यापासून देशभरात भ्रष्टाचारविरोधी मोहिमेनं वेग घेतलाय. अनेक नेत्यांच्या विरोधात ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या कारवाया होण्यास सुरुवात झाली. ना खाऊंगा, ना खाने दुंगा हे नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य चांगलंच गाजलंही. मात्र काळ जात गेला तसतसा या कारवाया केवळ काँग्रेस आणि विरोधी पक्षांवरच होतायेत का, असा सवाल निर्माण होऊ लागला. गेल्या १० वर्षांत जे नेते भाजपात आले, त्यांच्यापैकी २५ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असल्याचं समोर आलंय. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन भाजपा दुसऱ्या पक्षातील मोठ्या नेत्यांना गळाला लावते का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. गेल्या दोन तीन वर्षांत काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादीकडून असे आरोप सातत्यानं भाजपावर होताना दिसतायेत.
काय सांगते आकडेवारी?
१० वर्षांत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या २५ नेत्यांनी देशभरात भाजपात प्रवेश केलाय. त्यातील ३ जणांना त्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणातून क्लीन चिट मिळाली आहे. तर २० जणांच्या विरोधात सुरु असलेली कारवाई थंडावलेली दिसते आहे. विशेष म्हणजे या यादीत महाराष्ट्रातील १२ नेत्यांचा समावेश आहे.
या १२ नेत्यांपैकी ४ नेते शिवसेनेचे, ४ नेते काँग्रेसचे तर ४ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.
महाराष्ट्रातील कोणते नेते भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर भाजपात किंवा महायुतीत?
१. अजित पवार
२. अशोक चव्हाण
३. प्रताप सरनाईक
४. छगन भुजबळ
५. रवींद्र वायकर
ही काही नावं उदाहरणादाखल आहेत. अशा अनेक नेत्यांनी कारवाईपासून सुटका मिळवण्यासाठी भाजपात प्रवेश केला किंवा महायुतीशी जुळवून घेतल्याचं सांगण्यात येतंय.
पार्टी विथ डिफरन्स ही प्रतिमा भाजपानं गमावली का?
दोन दशकांपूर्वी भाजपाची प्रतिमा ही देशभरात पार्टी विथ डिफरन्स अशी होती. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यासारख्या नेत्यांनी आणि राम मंदिर आंदोलनाने भाजपाला देशात प्रतिष्ठा मिळवून दिली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या १० वर्षांच्या युपीए सरकारच्या काळात भाजपाची पहिल्यानेतृत्वाची फळी बाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर इलेक्टोरल मेरिट हा नवीन मंत्र घेऊन भाजपानं पुढची वाटचाल केल्याचं दिसलं. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत परफॉर्म ऑर पेरिश हा नवा मंत्र भाजपानं स्वीकारला. यात इतर पक्षांतील बडे नेते भाजपानं साम, दाम, दंड, भेद वापरुन आपल्या पक्षात आणले आणि भाजपा हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणवून घेऊ लागला. मात्र या सगळ्यात त्यांची तत्वाधिष्ठीत असणारी मूळ प्रतिमा मात्र मागे पडल्याचं सांगण्यात येतंय.
हेही वाचाःभाजपचा दबाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिंगोलीचा उमेदवार बदलला