मुंबई- नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असेल याचा तिढा अद्यापही कायम आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं या मतदारसंगातून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देऊन बराच काळ लोटला तरी नाशिक लोकसभा महायुतीतून कोण लढणार हे स्पष्ट झालेलं नाही. शिंदेंची शिवसेना, भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष या मतदारसंघावर दावा करतायेत. साताऱ्याची जागा उदयनराजेंना सोडण्याची तयारी अजित पावरांनी केलेली असून नाशिकची जागा छगन भुजबळ अजित पवारांच्या घड्याळ चिन्हावर लढणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आता त्यात आणखी एक ट्विस्ट आलाय.
छगन भुजबळ भाजपाच्या कमळावर लढणार ?
छगन भुजबळ यांनी नाशिकची जागा लढवावी, असा प्रस्ताव भाजपाच्या वरिष्ठांनी दिल्लीतून दिल्याचं सांगण्यात येतंय. त्याचबरोबर त्यांना कमळ या चिन्हावर मैदानात उतरवावं, यासाठीही पक्षश्रेष्ठी आग्रही आहेत. ओबीसी समाजाला आपलंस करण्यासाठी भाजपाची ही खेळी असल्याचं मानण्यात येतंय. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी त्यांच्या विरोधात राज्यात केवळ भुजबळच बोलत होते. त्याहीवेळी भुजबळांना भाजपाचा आशीर्वाद असल्याची चर्चा होती. आता तर थेट भुजबळांना कमळावर लढवण्याचा आग्रह भाजपा पक्षश्रेष्ठींनी धरल्याचं सांगण्यात येतंय.
भुजबळांना नाशिकमधून भाजपानं तिकीट दिल्यास राज्यभरात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. अनेक मतदारसंघात भाजपाकडे ओबीसी मतदारांचा कल वाढेल, असं भाजपातील धुरिणांना वाटतंय. मात्र त्याचबरोबर मराठा समाजाची नाराजीही भाजपाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. भुजबळ यांच्या विरोधात मराठा संघटना उमेदवार देण्याचीही शक्यता असून, त्यांना पाडण्यासाठी मोठे प्रयत्न केले जातील. जरांगे पाटील यांनी याबाबत जाहीर भाष्यही यापूर्वी केलेलं आहे.
हेमंत गोडसे यांचं काय होणार ?
नाशिकची जागा ही शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. दोन ते तीन वेळा त्यासाठी त्यांनी मुंबई-ठाण्यात शक्तिप्रदर्शनही केलेलं आहे. मात्र अद्याप त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आलेलं आहे. दुसरीकडे मतदारसंघात त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. अशा स्थितीत आता उमेदवारी कुणाला मिळणार यकडं सगळ्यांचं लक्ष आहे.
माधव समीकरण साधण्याचा भाजपाचा प्रयत्न
गोपीनाथ मुंडे यांनी माळी, धनगर आणि वंजारी अशा तीन जातींना एकत्र सोबत घेण्याचा माधवचा प्रयोग महाराष्ट्रात केला होता. आताही हाच प्रयत्न भाजपाकडून होताना दिसतोय. पंकजा मुंडे यांना बीडमधून तर धनगर मतांसाठी महादेव जानकरांना परभणीतून संधी देण्यात आली आहे. यातळ माळी समाजाच्या मतांसाठी छगन भुजबळांना कमळावर लढवण्याचे भाजपाश्रेष्ठींचे प्रयत्न असल्याचं सांगण्यात येतंय.