मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना रावेर लोकसभा (Raver Lok Sabha) मतदारसंघात राजकीय घडामोडीत चांगलाच वेग आला . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी या मतदारसंघातून दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील (shreeRam Patil) यांना उमेदवारी दिली आहे . त्यामुळे त्यांच्या या निर्णयाविरोधात शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एका पाठोपाठ राजीनामे दिले आहेत. यामध्ये भुसावळ, रावेर, वरणगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.त्यामुळे आता लोकसभेच्या तोंडावर जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का बसला आहे.
रावेर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे .तर महायुतीच्या रक्षा खडसे (Raksha Khadse) उमेदवार आहेत. यामुळे रावेरमध्ये दोघांमध्ये ही सरळ लढत होणार आहे. परंतु आता श्रीराम पाटलांच्या उमेदवारीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे . दरम्यान एका दिवसापूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली अन् अनेक वर्षांपासून पक्षाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला डावलण्यात आले, असा आरोप जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. दरम्यान यानंतर आता भुसावळचे माजी आमदार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष चौधरी (Santosh Chowdhary) यांनी बंडखोरी करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी पक्षात नाराजी वाढली असून ते अपक्ष उमेदवारी दाखल करून बंड करण्याची शक्यता आहे.त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना मोठा धक्का बसणार आहे .
दरम्यान, आज महाविकास आघाडीतील ठाकरे गटालाही पालघर (Palghar)जिल्ह्यात मोठं खिंडार पडलं आहे.डहाणूच्या तालुकाप्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला आहे. डहाणूचे शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख अशोक भोईर यांचा शेकडो समर्थकासह हितेंद्र ठाकुरांच्या बहुजन विकास आघाडीत जाहीर प्रवेश झाला. आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत विरारमध्ये बविआच्या कार्यालयात ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बविआमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.त्यामुळे या लोकसभेआधीच महाविकास आघाडीला चांगलाच धक्का बसला आहे .