अकलूज- भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयंत पाटील आणि हजारो समर्थकांच्या उपस्थइतीत अकलूजमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचाही पक्षात प्रवेश केल्याचं जाहीर केलंय. या प्रवेशामुळं माढ्यातील रणजीतसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील ही लढत निश्चित झालीय. सोलापूर आणि माढा मतदारसंघात मोठी राजकीय ताकद असलेलं मोहिते घराण्यानं पुन्हा घरवापसी केल्यानं या मतदारसंघांमध्ये आता भाजपासमोर आव्हान असणार आहे. मोहिते पाटील घराण्यातील सर्वच नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचचा निर्णय घेतलाय. केवळ रणजीतसिंह मोहिते पाटील हे भाजपाचे विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यांना वगळता सर्वच मोहिते पाटील कुटुंबीय तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत. या प्रवेशावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची घोषणाही जयंत पाटील यांनी केली असून ते 16 एप्रिल म्हणजेच मंगळवारी माढा लोकसभा निवडणुकीसाठी मविआचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
पवारांची डिनर डिप्लोमसी
या प्रवेशापूर्वी अकलूजमध्ये मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर शरद पवारांच्या उपस्थितीत डिनर डिप्लोमसी पार पडल्याचं पाहायला मिळालं. त्यात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार 2004 नंतर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. हा दिवस क्रांतीकारक दिवस असल्याचं यावेळी शिंदे म्हणाले आहेत. मोहिते पाटील शरद पवारांच्या सोबत आल्यानं प्रणिती शिंदे यांच्या विजयाचा मार्गही सुकर झाल्याचं मानण्यात येतंय. सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांबाबत या भेटीत चर्चा झाली. या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे निंबाळकरही उपस्थित होते.
मोहिते पाटील घेत असलेल्या निर्णयाचा चांगला संदेश राज्यात जाईल आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढतील असा विश्वासल या भेटीनंतर शरद पवारांनी व्यक्त केलाय,
उत्तम जानकरही मोहितेंच्या सोबत
मोहिते पाटील यांच्यासोबतच माढ्यात भाजपला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
माळशिरस तालुक्यातील भाजप नेते उत्तम जानकर गट आणि मोहिते पाटील गट एकत्रित येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. लोकसभेला मोहिते पाटील यांना तर विधान सभेला उत्तम जानकर यांना मदत करण्याचा अलिखित करार दोघांमध्ये झाल्याचं सांगण्यात येतंय. या घडामोडींनंतर अमित शहा आणि फडणवीस आज उत्तम जानकर यांची भेट घेणार आहेत.
शरद पवारांचे महायुतीला आव्हान
नगरमध्ये निलेश लंके यांना सोबत घेतल्यानंतर माढ्यात शरद पवारांनी मोहिते पाटील यांना सोबत घेऊन महायुतीला दुसरा धक्का दिल्याचं मानण्यात येतंय. मोहिते पाटील यांनी शरद पवारांना साथ दिल्यानं माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात आणि साते ते आठ विधानसभा निवडणुकांत परिणाम होण्याची शक्यता आहे.