मुंबई : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाना पटोले हे भाजपचे एजंट आहे, अनेक महत्त्वाच्या जागांवर त्यांनी कमकुवत उमेदवार दिल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोलेंवर केला होता. त्यानंतर आता नाना पटोलेंनी प्रकाश आंबेडकरांवर पलटवार केला आहे. आज नाना पटोले अकोल्यात होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आंबेडकरांवर जहरी टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकरांना कधीच मविआमध्ये यायचं नव्हतं. मला ‘भाजपचा एजंट’ संबोधणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या कोणत्याही सर्टिफिकेटची मला गरज नाही.दुसरी गोष्ट म्हणजे कोण कोणाचं एजंट आहे, हे जनतेला माहीत असल्याचं ते यावेळी म्हणाले. 2014 आणि 2019 च्या निवणुकीत भाजपचं एजंट म्हणून कोणी काम केलं हे अकोल्यातील जनतेला माहीत असल्याचं नाना पटोले म्हणाले. याशिवाय आंबेडकर हे श्रीमंत झाले मात्र आम्हाला वंचित ठेवल्याची कार्यकर्त्यांची भावना असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं. वंचितच्या मविआसोबतच्या सुरुवातीच्या बैठकांपासून काँग्रेस आणि वंचितमध्ये आलबेलं नसल्याचं दिसून येत होतं. वारंवार ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत होते.
यंदाच्या लोकसभेत अकोल्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीतून डॉ. अभय पाटील, महायुतीतून भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचितमधून स्वत: प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे अकोल्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. तिरंगी लढतीमुळे मतविभाजनाचा फटका बसू शकतो. मात्र कोणाला याचा फटका सहन करावा लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.