मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे होमग्राऊंड असलेल्या गोंदियातून धर्मरावबाबा आत्राम ( Dharmarao Baba Atram) यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे . यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्यांच्या जागी आता अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती समोर आली आहे . यांची लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे .
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपचा पराभव झाला ,महायुतीला यश मिळालं नाही . या मतदारसंघात काँग्रेसचे प्रशांत पाडोळे विजयी झाले. या जागेवर जरी भाजपचा उमेदवार असला तरी भंडारा-गोंदियाची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसवर होती. झालेला पराभव त्यामुळे आत्राम यांनी अचानक गोंदियाचा पालकमंत्री पद सोडण्यामागे राजकीय कारणंही आहेत का ? अशी शंका निर्माण होत आहे.दरम्यान आता प्रकृतीच्या कारणास्तव आपण हा निर्णय घेतला असल्याचे सांगत विधानसभेच्या अनुषंगाने आपण गडचिरोली आणि चंद्रपूरवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे . आता त्यांच्या जागी नवीन पालकमंत्री कोण याची उत्सुकता थांबली असून अदिती तटकरे याना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे .
महाविकास आघाडीच्या काळात धर्मराव बाबा आत्राम हे मंत्री होते. याशिवाय अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील त्यांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर धर्मरावबाबा आत्राम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री बनले.