@milindmane70
मुंबई: येत्या विधानसभा निवडणुकीत (assembly elections) कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील 15 पैकी एकही जागा काँग्रेसला (Congress) मिळण्याची सुतराम शक्यता नाही. कोकणात (Konkan) काँग्रेसने फक्त राष्ट्रवादी (शरद पवार) (NCP-SP) व शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) (UBT Shiv Sena) व्यासपीठावर जाऊन भाषणे करण्यापलीकडे कोकणातील काँग्रेसच्या नेत्यांना दुसरे कोणतेही काम शिल्लक राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष (PWP) यांचा समावेश आहे. कोकणातील या तिन्ही जिल्ह्यात काँग्रेसचा एकही विधानसभा सदस्य (MLA) किंवा विधान परिषद (MLC) सदस्य नाही. कोकणातील पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेतृत्व जवळपास संपुष्टात आले आहे.
जे विद्यमान आमदार आहेत त्यांना किंवा त्यांच्या पक्षाच्या अन्य उमेदवाराला त्या मतदारसंघात संधी दिली जाणार आहे. एखाद्या आमदाराने पक्ष बदलला तरी मूळ पक्षच त्या जागी निवडणूक लढणार आहे, अशी महाविकास आघाडीची (MVA) रणनीती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून शरद पवारांची (Sharad Pawar) राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना यांचेच उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.
रायगड (Raigad) जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघांपैकी उरण (Uran), पनवेल (Panvel) व पेण (Pen) या विधानसभा मतदारसंघात भाजपाचे (BJP) विद्यमान आमदार आहेत. तर कर्जत (Karjat), अलिबाग (Alibaug) व महाड (Mahad) या तीन मतदारसंघात शिवसेना पक्षाचे आमदार आहेत. हे तिन्ही आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडे असले तरी या जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना लढणार आहे. त्याला अलिबाग विधानसभा मतदारसंघ हा अपवाद असेल.
अलिबाग मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्याकडून शेतकरी कामगार पक्षाला (Peasants and Workers Party) सोडण्यात येणार आहे. त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र प्रवीण ठाकूर यांनी जरी काँग्रेस नेतृत्वाकडे या जागेची मागणी केली असली, तरी ही जागा मूळ शिवसेना पक्षाची असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ती शेका पक्षाला सोडली आहे. त्यामुळे या मतदारसंघावर काँग्रेसने दावा करूनही उपयोग होणार नसल्याची चर्चा आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन ही एकमेव जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. या मतदार संघाचे नेतृत्व करत असलेल्या विद्यमान आमदार व राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे (Minister Aditi Tatkare) या अजित पवार गटात असल्याने शरद पवार हे आदिती तटकरे यांच्या विरोधात त्यांच्या पक्षाचा उमेदवार देणार आहेत.
श्रीवर्धनला कुणबी समाजाचा आयात उमेदवार असेल?
श्रीवर्धन विधानसभेची (Shreevardhan assembly constituency) जागा सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र पक्ष फुटी नंतर (split in NCP) ही जागा अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे गेल्याने शरद पवार यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. आदिती तटकरे यांचा पराभव करून अजित पवार यांना पुन्हा एकदा धक्का देण्यासाठी शरद पवार सज्ज झाले आहेत.
या मतदारसंघात कुणबी समाजाची (Kunbi community) ताकद पाहता शरद पवारांचा उमेदवार दुसऱ्या पक्षातून आयात केलेला आणि कुणबी समाजाचा असेल असे समजते. हा संभाव्य उमेदवार महाविकास आघाडीतीलच एका घटक पक्षाचा पदाधिकारी असल्याने त्या पक्षाच्या प्रमुखांनी हिरव्या झेंडा दाखवल्यानंतरच तो पदाधिकारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करेल आणि त्याची उमेदवारी जाहीर केली जाईल, असे सांगितले जात आहे.
तसे झाले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांना राज्यातील अन्य मतदारसंघात लक्ष घालता येणार नाही. त्यांचं सगळं लक्ष त्यांच्या मुलीला निवडून आणण्याकडे असेल आणि अशा प्रकारे शरद पवार तटकरेंची श्रीवर्धनमध्येच कोंडी करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.