मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी मदतीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना राज्य सरकारने हेक्टरी केवळ २२ हजार रुपयांची मदत जाहीर करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
१५ मे रोजी गिरगाव चौपाटी येथून मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर धडक मोर्चा काढून सरकारला गुडघे टेकायला भाग पाडण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांसोबत शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, अशी ठाम भूमिका ठाकरे यांनी घेतली.
कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने धडक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले की, गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी संकटात सापडल्यानंतर मदतीसाठी रस्त्यावर उतरला आहे. राज्य सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेत असून उद्योगपतींची कर्जे माफ केली जात आहेत; मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे.
आंबा उत्पादक, काजू उत्पादक आणि मत्स्य व्यवसायिक हे कोकणचे कणा आहेत. मात्र सध्या हे तिन्ही घटक संकटात आहेत. चालू वर्षी मोहोर गळती, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार, फळमाशीचा प्रादुर्भाव आणि वाढता कीटकनाशक खर्च यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आंबा संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक होते; परंतु कृषी, फलोत्पादन आणि मत्स्य विभागाच्या उपाययोजना केवळ कागदावरच राहिल्या, असा आरोपही करण्यात आला.
आज झालेल्या बैठकीत १५ मे रोजी सायंकाळी ४ वाजता गिरगाव चौपाटी येथून ‘वर्षा’ निवासस्थानाकडे मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोर्चात शिवसेनेसह मनसे, राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
यावेळी खासदार अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने, वैभव नाईक, गणेश गावकर, किरण टेंभुलकर, सुशांत नाईक, अजय तेली, उमेश वाळके यांच्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते.

