ताज्या बातम्या महाराष्ट्र

दादांच्या मृत्यूबाबत माझ्याही मनात शंका आहे;  बारामतीत सुनेत्रा पवारांचे भावनिक वक्तव्य

Sunetra Pawar addressing an emotional rally in Baramati raising questions over Ajit Pawar plane crash

मुंबई: बारामती पोटनिवडणुकीच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत प्रथमच सार्वजनिकरित्या शंका व्यक्त करत त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्याने या प्रकरणाला नवे राजकीय आणि भावनिक वळण मिळाले आहे.

मंगळवारी बारामती येथे झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित असताना सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच भावूक होत हे वक्तव्य केले. “दादांच्या अपघाताविषयी तुमच्याप्रमाणेच माझ्याही मनात दाट शंका आहे. त्या सर्व शंकांचे निरसन होणे गरजेचे आहे,” असे सांगत त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचा पुनरुच्चार केला. स्व. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच मोठ्या प्रचारसभेत बोलताना सुनेत्रा पवार यांना काही क्षण भावनांना आवर घालता आला नाही. मात्र स्वतःला सावरत त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेच्या चौकशीसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडेही मागणी केली असून विविध यंत्रणांमार्फत तपास सुरू आहे. “दादा आता आपल्यात नाहीत हे कटू सत्य आहे. पण बारामतीला नंबर वन बनवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी लढणार,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना भावनिक साद घातली. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभास्थळी काही क्षण शांतता पसरल्याचे पाहायला मिळाले.

राजकीय संकेत अधिक स्पष्ट?

सुनेत्रा पवार यांच्या या वक्तव्याला केवळ भावनिक प्रतिक्रिया म्हणून पाहणे पुरेसे ठरणार नाही, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पुतण्याने, आमदार रोहित पवार यांनी विविध व्यासपीठांवरून या दुर्घटनेबाबत शंका व्यक्त केली होती. आता त्याच भूमिकेला सुनेत्रा पवार यांनीही सार्वजनिक दुजोरा दिल्याचे मानले जात आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भावनिक लाट की चौकशीचा दबाव?

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. एका बाजूला सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न दिसत असताना, दुसऱ्या बाजूला दुर्घटनेच्या चौकशीचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे वक्तव्य झाल्याने या मागणीचे राजकीय वजन आणखी वाढले आहे.

समर्थनाचा सूचक संदेश

आपल्या भाषणात सुनेत्रा पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शरद पवार यांच्या आशीर्वादाचा विशेष उल्लेख केल्याने व्यासपीठावर उपस्थित काही नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसून आल्याची चर्चा रंगली.

आता पुढे काय?

सुनेत्रा पवार यांच्या वक्तव्यानंतर दोन महत्त्वाचे प्रश्न पुढे आले आहेत: अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची चौकशी नव्याने गती घेणार का? बारामतीतील ही निवडणूक भावनिक आणि राजकीय संघर्षात रूपांतरित होणार का? एकंदरीतच, या वक्तव्यामुळे बारामती पोटनिवडणूक केवळ राजकीय लढत न राहता भावना, संशय आणि सत्तासमीकरणांचा संगम बनत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात