कुरले गावाजवळ पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवाशांनी आपत्कालीन दरवाजातून सुरक्षित बाहेर पडून टळला अनर्थ
महाड: महाड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर दिसू लागला असून, महाड-दापोली राज्य मार्गावरील कुरले गावाजवळ पुणे (पिंपरी-चिंचवड) आगाराच्या दोन एसटी बस घसरून रस्त्याच्या कडेला झुकल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ही घटना दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने दोन्ही बस रस्त्याच्या कडेला उतरल्या आणि एका बाजूला झुकल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बसमधील प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
अपघातांच्या मालिकेने वाढवली चिंता
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षीही महाड-दापोली राज्य मार्गावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड आगाराच्या काही एसटी बस अपघातग्रस्त झाल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिकांनी या मार्गावर एसटी बसचा वेग, पावसाळ्यातील सुरक्षित वाहनचालक प्रशिक्षण, तसेच वाहनांच्या टायरची नियमित तपासणी याकडे परिवहन प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण काय होते, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

