महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड मतदारसंघातील १० हजार गणेशभक्तांसाठी मोफत बस सेवा

somnath-ozarde-mahad-ganeshotsav-free-bus-service.jpg

मुंबई, ठाणे, नालासोपारा, पुणे-पिंपरी चिंचवडमधून गावाकडे बस सोडणार; आतापर्यंत २७ बसेसचे बुकिंग — सोमनाथ ओझर्डे

Milind Mane

महाड : गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, पुणे आणि उपनगरांतून महाड विधानसभा मतदारसंघातील गावांकडे येणाऱ्या सुमारे १० हजार गणेशभक्तांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा समन्वयक तथा शिरगावचे सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे आणि त्यांच्या मित्रपरिवारातर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ओझर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सेवा सुरू असून, यंदा तिचा विस्तार संपूर्ण महाड विधानसभा मतदारसंघात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

ओझर्डे म्हणाले की, काही जणांनी निवडणुकीच्या काळात मोफत बससेवेचे उपक्रम सुरू केले आणि निवडणुका संपल्यानंतर ते बंद केले. मात्र आपण निवडणुकीतील विजय-पराभवाशी हा उपक्रम जोडलेला नसून सामाजिक बांधिलकीतून तो सातत्याने सुरू ठेवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “जिल्हा परिषद निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी त्यामुळे हा सामाजिक उपक्रम बंद केला नाही. उलट पूर्वी एका जिल्हा परिषद गटापुरती असलेली सेवा आता संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी विस्तारित केली आहे,” असे ओझर्डे यांनी सांगितले.

मुंबई-पुण्यातून विविध ठिकाणांहून बसेस

महाड विधानसभा मतदारसंघातील महाड, पोलादपूर आणि संबंधित परिसरातील गणेशभक्तांना गावाकडे आणण्यासाठी मुंबई सेंट्रल, नालासोपारा, ठाणे-खोपट, पुणे-स्वारगेट, पिंपरी-चिंचवड यासह विविध ठिकाणांहून एसटी बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या बससेवेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून, गणेशोत्सवाच्या काळातील सुट्ट्या लक्षात घेऊन १२ आणि १३ सप्टेंबर रोजी सर्वाधिक बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आल्याचे ओझर्डे यांनी सांगितले.

गेल्या वर्षी २,४०० प्रवाशांना लाभ

मागील वर्षी हा उपक्रम करंजाडी जिल्हा परिषद गटापुरता मर्यादित होता. त्यावेळी सुमारे २,४०० नागरिकांनी मोफत बससेवेचा लाभ घेतला होता. यंदा मात्र त्याची व्याप्ती वाढवून संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील सुमारे १० हजार गणेशभक्तांपर्यंत सेवा पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि अन्य शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी त्यांच्या गावापर्यंत आणण्याची व्यवस्था या उपक्रमातून करण्यात येणार आहे.

२०२२पासून सुरू आहे उपक्रम

ओझर्डे यांच्या म्हणण्यानुसार, २०२२पासून हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. यंदाचे वर्ष या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे. “गणपती बाप्पा आणि लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने हा उपक्रम सुरू आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून तो राबवत आहोत. जोपर्यंत देव ताकद देईल तोपर्यंत ही मोफत बस सेवा सुरू ठेवणार,” असे ओझर्डे यांनी सांगितले. यंदाच्या गणेशोत्सवासाठी आतापर्यंत २७ बसेसचे बुकिंग करण्यात आले असून, प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार आणखी बसेसची व्यवस्था केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात