X: @therajkaran
राष्ट्रवादीत बंड करून शिंदे गटात सामील झालेल्या अजित पवारांवर (Ajit pawar) त्यांचे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, शरद पवार यांनी आपल्यावर अनेक उपकार केले आहेत. आज ते ८३ वर्षांचे असताना त्यांची साथ सोडून जाणे हे मला पटले नाही. हा विचार मला वेदना देऊन गेला. आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही. पुढची काही वर्ष आपल्याला दुसऱ्या कुणाकडून (भाजप) तरी लाभ मिळणार आहे, या हेतूने अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडणं हा विचारच नालायकपणाचा आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली.
अजित पवार यांच्या चांगल्या-वाईट दिवसात मी नेहमीच त्यांच्यासोबत राहिलो आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयात मी त्यांना साथ दिली. मात्र, या सर्व काळात मी त्यांना आमच्या चर्चेत सांगितले की, तुझ्याकडे आमदारकी आहे तर खासदारकी तरी आपण शरद पवार साहेबांना (Sharad pawar) दिली पाहिजे, असे ते म्हणाले.
शरद पवार यांना पाठिंबा देताना श्रीनिवास म्हणाले, नागरिक आपल्या शेतावर जातात, बांधावर जात असतात, त्यांनी जमीन आपल्या नावावर केली म्हणजे त्यांना घराबाहेर काढायचे नसते. ज्यांना कुणाला पदे आणि प्रतिष्ठा मिळाली असेल ती शरद पवार यांच्यामुळेच मिळाली आहेत आणि त्याच पवारांना वय झाले म्हणून आता सांगायचं कीर्तन करा, घरी बसा, हे मला पटत नाही. मी राजकारणी माणूस नाही. पण, या गोष्टी मला पटत नाही. जशी औषधांवर एक्सपायरी डेट असते. तशी काही नात्यामध्येही असते. ती संपली असे समजून पुढे चालत जावे लागले, असे देखील पवार म्हणाले.
श्रीनिवास यांचा मुलगा योगेंद्र पवार यांनी यापूर्वीच शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
ते पुढे म्हणाले, ही चाल कुणाची आहे ही माहिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपला (BJP) आणि आरएसएसला( RSS )पवार हे नाव संपवायचे आहे. त्यातूनच ही खेळी त्यांनी खेळली आहे. त्यांनी आतापर्यंत खूप प्रयत्न केला. मात्र, ते यशस्वी होऊ शकले नव्हते. तुम्हाला इतिहास माहिती आहे, की घर फोडले की ते कुटुंब संपवता येतं. जर कुटुंब एकत्र असेल तर त्या घराला काही ही होत नाही. मला हे बिलकुल पटले नाही. वय वाढले म्हणून तुम्ही साहेबांना कमजोर समजू नका, असेही श्रीनिवास पवार म्हणाले.