X: @therajkaran
आगामी लोकसभा निवडणुकीकरिता महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) 22, 16 आणि 10 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा सोडण्याचा निर्णय झाला आहे. या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेनाच सर्वाधिक जागावर निवडणूक लढवणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीच्या आज ठरलेल्या फॉर्म्युल्यात वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) समावेश नाही. पण तरीदेखील वंचितसाठी 4 जागा सोडण्याचा विचार महाविकास आघाडी करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाविकास आघाडीनं जर वंचितला सोबत घेतलं, तर मात्र 20-15-9-4 यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला 20, काँग्रेस पक्षाला 15, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 9, वंचित बहुजन आघाडीला 4 जागा असणार आहेत. वंचित बहुजन आघाडीला शिवसेना गटाच्या कोट्यातून 2, काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून 1 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोट्यातून 1 जागा देण्यावर या पक्षांची तयारी असून वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकीकडे लक्ष लागलं आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी (Raju Shetti) स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाविकास आघाडी बाहेरून पाठींबा देणार आहेत. सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला, तर रामटेक जालनाची जागा काँग्रेस पक्षाला मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. माढाची जागा रासपला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून दिली जाणार आहे. तसेच, भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.