मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात (Baramati Lok Sabha) पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे . या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) रिंगणात आहेत तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)रिंगणात आहेत . दरम्यान या मतदारसंघातून कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून अजित पवारांनी( Ajit Pawar) लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या उमेदवारी अर्जांची आज छानणी झाली. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा लोकसभेचा अर्ज नामंजूर केला आहे .त्यामुळे महायुतीला (MahaYuti) बारामतीत मोठा धक्का बसला आहे .
लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघात महायुतीकडून मोठी खबरदारी घेत अजित पवार यांचा डमी अर्ज भरला गेला होता . मात्र, एकाच वेळी दोन अर्ज मंजूर करता येत नसल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर झाला आहे. त्यामुळे बारामतीत आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा थेट सामना रंगणार आहे. येत्या ७ मे रोजी बारामतीसाठी, तर १३ मे रोजी पुणे, शिरूर आणि मावळसाठी मतदान होणार आहे. त्यानुसार बारामती मतदारसंघासाठी १२ ते १९ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवार यांनी प्रतिज्ञापत्रातून संपत्तीविषयी माहिती दिली आहे. त्यांच्या नावावर स्थूल मूल्य हे १२ कोटी ५६ लाख ५८ हजार ९८३ एवढं आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्याकडे ३८ कोटी रुपये किंमतीची स्थूल मालमत्ता आहे. तर त्यांचे पती सदानंद सुळे यांची तब्बल एक अब्ज १४ कोटी एवढी प्रचंड संपत्ती आहे.
दरम्यान दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा कन्हेरीच्या मारोती मंदिरात नाराळ फोडत प्रचाराला सुरुवात केली आहे . त्यानंतर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघाची सून म्हणून एकच सांगते. आपल्या आवडत्या चिन्हाला मतदान करुन बारामतीची सून म्हणून मला विजयी करावं. कन्हेरीचा मारोती कायम माझ्या पाठीशी राहिलाय आणि पुढेही राहणार, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे .