मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये (Baramati Lok Sabha)नणंद-भावजय अर्थात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar)यांनी शरद पवार गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.आज त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्यावर निशाणा साधला आहे .अजितदादा हे शरद पवारांनी लावलेलं रोपटे आहेत. बारामतीचा किल्लेदार म्हणून अजिदादांना नेमलं होतं. आता किल्लेदार फितूर झाले आहेत. किल्ला एकदा हातातून जाऊ शकतो. मात्र, यंदा शरद पवार सावध आहेत.असे त्यांनी म्हटले आहे .
जानकर पुढे म्हणाले , मी अजितदादांच्या राष्ट्रवादीत असून अजून पक्ष सोडलेला नाही मात्र त्यांचा पराभव करूनच मी पक्ष सोडेन. अजितदादांनी जसं शरद पवारांना पक्षातून काढून टाकलं, तसं मला काढलं, तर मी अजितदादांना काढून टाकेन असेही ते म्हणाले आहेत . अजितदादांच्या दराऱ्याची भीती वाटत नाही, मला स्वाभिमान आहे. तालुक्यातील जनतेचा स्वाभिमान जपणं हीच माझी भूमिका आहे. आपल्या प्रपंचासाठी ही लढाई नाही. गोरगरीबांमध्ये माझ्या रूपानं भविष्य लपलं आहे. मी बेईमान झालो, तर लोकांची एक पिढी बर्बाद होईल. विजय होऊद्या किंवा पराभव होऊद्या लोकांबरोबर राहणं ही माझी भूमिका आहे असे ते म्हणाले आहेत .
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तम जानकर आणि मोहिते पाटील घराण्याने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. अशात उत्तम जानकर यांनी इंदापूरमध्ये बोलत असताना अजित पवारांची (Ajit Pawar) ही शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष ही अस्तित्वात राहणार नाही आणि अजित पवार देखील राजकारणात नसतील, अशी टीका उत्तम जानकर यांनी केली आहे.