X: @vivekbhavsar
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेससोबत बिघडलेले संबंध आणि त्याचा राज्याच्या तत्कालीन काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कारभारावर होणारा विपरीत परिणाम बघता तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly election) सहा महिने आधीच मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्यात येणार होते आणि त्या जागी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe – Patil) यांची निवड जवळपास निश्चित झाली होती, असा गोप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज केला.
येथील “सुयोग” या पत्रकार निवासस्थानाला आज सकाळी अजित पवार यांनी भेट दिली आणि पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्यासोबत अत्यंत उत्तम संबंध असल्याचा निर्वाळा देतानाच नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या संदर्भातील फडणवीस यांनी दिलेल्या पत्रामुळे सत्ताधारी महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांमध्ये वितुष्ट आल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे खुलासा अजित पवार यांनी केला.
याचाच धागा पकडून अजित पवार यांनी 2014 मधील पृथ्वीराज चव्हाण यांच्या संदर्भातील एक आठवण सांगितली. पवार म्हणाले, चव्हाण यांच्यासोबतचे आमचे संबंध विकोपाला गेले होते. त्याला अनेक कारणे होती. वास्तविक त्यावेळी विरोधी पक्षात असलेली शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपा (BJP) हेच खरे तर काँग्रेसचे (Congress) विरोधक असायला हवे होते, मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसलाच (NCP) काँग्रेसचे पहिल्या क्रमांकाचे विरोधक आणि शत्रू समजत होते.
पवार म्हणाले, याची कल्पना दिल्लीतील त्यांच्या वरिष्ठांना देखील आली असावी आणि म्हणून काँग्रेसच्या हायकमांडने (Congress High Command) विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधीच पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात अहमद पटेल (Ahmed Patel) यांच्याकडून पवार साहेबांना (शरद पवार) माहिती देण्यात आली होती तसेच राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) या तिघांपैकी कोणत्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्रीपदासाठी पसंती असेल अशी विचारणाही पटेल यांनी पवार साहेबांना (Sharad Pawar) केली होती, अशी माहिती अजित पवार यांनी पुरवली.
अजित पवार पुढे म्हणाले की, मोदी बागेत मला साहेबांनी बोलावून घेतले आणि अहमद पटेल यांच्याशी झालेले बोलणे मला सागितले. मी म्हणालो की मुख्यमंत्री कोणाला करायचा हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याचा निर्णय त्यांनी घ्यावा. उपमुख्यमंत्री कोणाला करायचा याचा निर्णय जसा आपण घेतो, त्यासाठी कोणाला विचारत नाही, तसं मुख्यमंत्री कोणाला करावे हा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा प्रश्न आहे, तो निर्णय त्यांनी घ्यावा, असे मी साहेबांना सांगितले.
एके दिवशी नगरला मी एका आमदाराच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित होतो. तिथे माझ्या शेजारी राधाकृष्ण विखे – पाटील येऊन बसले आणि त्यांनी मला सांगितले, पृथ्वीराज चव्हाण यांना हटवून मला मुख्यमंत्री करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या सरकारमध्ये तुम्हाला कोणते सचिव हवे आहेत, ते तुम्ही मला सांगा, त्याप्रमाणे आपण बदल करूया.
अजित पवार म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण आषाढी एकादशीसाठी (Ashadhi Ekadashi) पंढरपूरला गेले होते आणि बहुतेक त्यांनाही कुणकुण लागली होती की राज्यात नेतृत्व बदल केला जात आहे. ते तडक सोलापूरला (Solapur) आले, तिथून मुंबईला येऊन त्यांनी रात्री दिल्ली गाठली. राहुल गांधी (Rahul Gandhi) परदेशामध्ये होते आणि त्याच दिवशी ते रात्री दिल्लीला (Delhi) परतणार होते. त्यामुळे चव्हाण यांनी विमानतळावरच राहुल गांधी यांची वाट बघायचा निर्णय घेतला, रात्री केव्हा तरी पृथ्वीराज चव्हाण आणि राहुल गांधी यांची विमानतळावर भेट झाली आणि ते मुंबईला परतले. नंतर अहमद पटेल यांचा पवार साहेबांना फोन आला की जे काही आधी ठरलं होतं ते सगळं आता रद्द झाले आहे आणि पृथ्वीराज चव्हाणच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहेत.
चव्हाण यांच्या कारभाराला कंटाळून विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असताना राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि १४ सप्टेंबर २०१४ रोजी राज्यात राष्ट्रपती राजवट (President Rule) लागू झाली होती.
पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला संपवण्यासाठीच पाठवण्यात आले होते, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आजही खाजगीमध्ये करतात. अजित पवार यांचा चव्हाण यांच्यावर कायमच राग राहिला आहे. चव्हाण यांच्या काळातच महाराष्ट्र राज्य सहकारी (Maharashtra State co-op bank) अर्थात शिखर बँकेची चौकशी सुरू झाली आणि या बँकेवर प्रशासक बसवण्यात आले होते. त्या काळात या बँकेत 25000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला आणि अजित पवारांसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक तत्कालीन संचालकांची चौकशी देखील झाली होती.
पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्यात येणार होते, हे सांगण्याचा तसा आज इतक्या वर्षांनी काहीही संदर्भ नसला, तरीही अजित पवार यांच्या मनामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल असलेला राग आजही किती तीव्र आहे, तेच आजच्या त्यांच्या या गौप्यस्फोटातून दिसून आला.