अकोला : आज काँग्रेसकडून लोकसभेसाठी सात उमेदवारांसह अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवाराचीही घोषणा करण्यात आली आहे. अकोला महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आजच शिवसेना ठाकरे गटाच्या आढावा बैठकीत बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दोन टर्म नगरसेवक राहिलेले राजेश मिश्रा यांच्या नावाची घोषणा केली आहे. यामुळे या पोटनिवडणुकीत आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गोवर्धन शर्मा ७३,२६२ मतांनी विजयी झाले होते. तब्बल २९ वर्षांनंतर भाजपला या मतदारसंघात यश आलं होतं. यावेळी काँग्रेसचे साजिद खान यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. विशेष म्हणजे दोघांमध्ये अवघ्या २५९३ मतांचं अंतर होतं. मात्र गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात (३ नोव्हेंबर २०२३) भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं. ही भाजपसाठी मोठी हानी मानली जात होती. त्यात विधानसभा निवडणुकीला एका वर्षांहून कमी कालावधी असल्याने येथे पोटनिवडणूक होणार की नाही, असा प्रश्न होता. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर संधू , ज्ञानेश कुमार यांनी अकोला पश्चिम मतदारसंघात येत्या 26 एप्रिलला पोटनिवडणुक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर सर्व पक्ष कामाला लागले.

अकोला पश्चिम हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ राहिला आहे. मात्र आज ठाकरे गटाच्या आमदाराकडून या जागेवर दावा सांगण्यात आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटासह काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू असल्याने या जागेचं भविष्य काय असेल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.