X: @therajkaran
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना जोर आला आहे. त्यावर दानवे यांनी म्हटले आहे की, मी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा शिवसैनिक आहे. मी सत्ता आणि खुर्चीसाठी हपापलेला नाही. उद्या मला पक्षाने सगळं सोडायला सांगितलं तर मी तयार आहे. मी निवडणुकीसाठी गद्दारी करणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
शिंदे गटातील (Shinde Sena) प्रवेशाच्या चर्चेने जोर धरल्यानंतर दानवेंनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्याविषयीची नाराजी उघडपणे बोलून दाखवली. चंद्रकांत खैरे नेहमी मला डावलण्याचा प्रयत्न करतात. दोन दिवसांपूर्वी प्रचार कार्यालयाच्या स्तंभ पूजनाची देखील मला कोणतेही माहिती देण्यात आली नव्हती. तर, लोकसभा निवडणुकीत मला उमेदवारी मिळावी अशी माझी मागणी आहे. मी पक्षाचा कट्टर शिवसैनिक आहे. पक्षाच्या विषयी संभ्रम निर्माण होऊ शकत नाही. इतर कोणताही उमेदवार दिला तर नुकसान होऊ शकते, खैरे यांना उमेदवारी दिली तरी नुकसान होऊ शकते, आता माझ्यामुळे खैरे पडले असे त्यांनी बोलून दाखवू नयेत, असे दानवे यांनी म्हटले होते.
दरम्यान, शिंदे गटाच्या प्रवेशाच्या चर्चेबाबत तुमच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय, असा प्रश्नही दानवे यांना विचारण्यात आला. त्यावर दानवे यांनी म्हटले की, माझी आई आमच्या कुटुंबाची प्रमुख आहे. आमच्यापेक्षा जास्त संवेदनशील ती आहे. तिने मला अगोदरच सांगितले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाशी बेईमानी करता कामा नये. माझ्या आईचं उद्धव ठाकरेंवर प्रेम आहे. त्यामुळे मी त्यांची साथ सोडून शिंदे गटात गेलो तर तुझा आणि आमचा संबंध संपला, अशी सक्त ताकीद आईने मला दिल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.