मुंबई- दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कोणाचा उमेदवार असणार, यावरुन महायुतीत चुरस रंगलेली आहे. भाजपानं या जागेवर दावा केला असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या मतदरासंघातून प्रचाराला लागले असल्याचं दिसतंय. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली ही जागा भाजपाकडे जाऊ नये यासाठी या मतदारसंघातील, शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी पुढे सरसावले आहेत. त्यांनी पत्र लिहून ही जागा शिंदे शिवसेनेनं लढवावी अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय ?
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवण्याचं संपूर्ण हिंदूस्थानाचं स्वप्न आहे. आम्ही कार्यकर्ते या ध्येयासाठी दिवसरात्र काम करुन हे स्वप्न साकार करु, पण हे सगळं करत असताना आम्ही दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार अपेक्षित करतो, कारण हा मतदारसंघ मूळ शिवसेनेचा आहे. या मतदारसंघात आत्तापर्यंत धनुष्यबाण हेच चिन्ह चालत आलं आहे. या लोकसभा मतदारसंघात कट्टर शिवसैनिकांच्या फौजा आहेत. २०१४, २०१९ साली या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे. १९८९, १९९१ आणि १९९८ साली दिवंगत नेते मुरली देवरा त्यानंतर २००४ आणि २००९ सालापासून मिलिंद देवरा यांचं वर्चस्व मतदारसंघावर राहिलेलं आहे. आता मिलिंद देवरा हे शिवसेनेते आलेले आहेत. त्यामुळे आपल्या पक्षाला लाखोंचं मताधिक्य मिळू शकतं. दक्षिण मुंबईतल्या घराघरात धनुष्यबाण पोहचलेले आहे. कट्टर सैनिक या दक्षिण मुंबईतून उमेदवार असेल तर पक्षाची दक्षिण मुंबईतील ताकदही आणखी वाढेल. आपण शिवसेना या पक्षाचे मुख्य नेते आहात. आपण कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन आम्हाला न्याय द्याल ही अपेक्षा
काय होणार दक्षिण मुंबईत?
दक्षिण मुंबईतल्या दोनशे पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी सह्या करून हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलं आहे. मिलिंद देवरा ज्यावेळी शिंदे शिवसेनेते आले त्यावेळी देवरा यांनाच या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळेल असं सांगण्यात येत होतं. मात्र राज्यसभेच्या रिक्त जागी मिलिंद देवरा यांना राज्यसभेत पाठवण्यात आलं. त्यावेळी भाजपाला ही जागा लढवायची असल्याचं स्पष्ट झालं होतं. आता महायुतीच्या जागावाटपात नेमकं काय होतं ते पाहावं लागणार आहे.
हेही वाचाःमविआ जागावाटपाचा तिढा दोन जागांवर अडला, नेमकं काय घडलंय?