ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवतारेंना आवरा, अन्यथा…

आनंद परांजपेंचा इशारा

मात्र कल्याण लोकसभेची आकडेवारी काय सांगते?

X: @therajkaran

विजय शिवतारेंच्या बदला घेण्याच्या आक्रमक बोलीने अजित पवारांना बारामतीमध्ये बॅकफूटवर नेले आहे. स्वाभाविकच राष्ट्रवादीमधून त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांनाच इशारा देत, वाचाळ शिवतारेंना आवरा, अन्यथा कल्याण लोकसभेत वेगळे चित्र दिसेल असे सुनावले आहे. मात्र कल्याण मतदारसंघाची आकडेवारी पाहता हा इशारा कागदावरच राहू शकतो की प्रत्यक्षात डॉ श्रीकांत शिंदे यांना अडचणीत आणू शकतो हे बघणे क्रमप्राप्त आहे.

विधानसभेच्या मागील निवडणुकीत अजित पवार यांनी थेट जाहीर भाषणात, तुम्ही कसे निवडून येता ते बघतोच, असे थेट चॅलेंज करत विजय शिवतारे यांना पराभूत केले होते. तो पराभव आणि जाहीर सभेत केलेला पाणउतारा विजय शिवतारे यांच्या जिव्हारी लागला आहे. पण आता बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे शिवतारेंची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे. विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकांबाबत आधी ठरवा मग लोकसभेत कोणाला पाठिंबा द्यायचा ते ठरवू असा पवित्रा काही दिवसांपूर्वी शिवतारे यांनी घेतला होता. मात्र या मानसिक अवस्थेत जास्त काळ न राहता, काल त्यांनी थेट पवार कुटुंबालाच धारेवर धरत इशारा दिला आहे. बारामतीचा सात बारा कोणा एका कुटुंबाचा नाही, त्यामुळे या मतदारसंघातून पवारांना पाडा, असे थेट आव्हानच शिवतारेंनी जाहीरपणे केले आणि त्याच्या प्रतिक्रिया लगेचच उमटल्या.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आज शिवतारेंना आवरा अन्यथा डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात वेगळे चित्र निर्माण होईल, असे थेट मुख्यमंत्री शिंदे यांनाच सांगितले आहे. मात्र गेल्या तीन लोकसभा निवडणुकीतील कल्याण लोकसभा मतदारसंघांची आकडेवारी काय सांगते याकडे देखील अभ्यासपूर्वक बघणे आवश्यक आहे.

२००९ साली आनंद परांजपे स्वतः या मतदारसंघातून शिवसेनेकडून लढले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे वसंतराव डावखरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मनसेने देखील तेव्हा प्रथमच लोकसभा निवडणुकीत आपले नशीब अजमावले होते. राज ठाकरे यांचा करिष्मा तेंव्हा ऐन बहरात होता. परिणामी मनसेच्या वैशाली दरेकर यांना तेव्हा लाखाच्या घरात तब्बल १,०२,०६३ इतकी मतं मिळाली होती. अजातशत्रू अशी ओळख असणाऱ्या डावखरे यांच्या प्रचारासाठी तेव्हा बॉलिवूडच्या भाईजान सलमान खान याने मुंब्रा येथे प्रचार रॅली केली होती. मात्र एवढे सगळे होऊनही राष्ट्रवादीला या निवडणुकीत ३५ टक्के म्हणजेच १,८८,२६७ इतकी मते मिळाली तर शिवसेनेचे आनंद परांजपे हे ३९ टक्के म्हणजेच २,१४,४७६ मते मिळवून विजयी झाले होते.

२०१४ साली, हेच आनंद परांजपे शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे राहिले आणि त्यांनी २३ टक्के म्हणजेच १,९०,१४३ इतक्या मतांची बेगमी केली. तर परांजपे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने शिवसेनेने थेट एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांना मैदानात उतरवले. तो पर्यंत देशभर नरेंद्र मोदी या नावाचा डंका सुरू झाला होता व त्याचाच परिणाम म्हणून डॉ शिंदे यांनी या लढाईत तब्बल ५३ टक्के म्हणजेच ४,४०,८९२ इतकी मते मिळवली तर मनसेच्या राजू पाटील यांना १,२२,३४९ मते मिळाली होती.

मागच्या २०१९ च्या निवडणुकीत देखील मोदी लाट संपूर्ण देशभर होतीच. यावेळी शिवसेनेच्या डॉ शिंदे यांची मते दहा टक्क्यांनी वाढून ६३ टक्के इतकी म्हणजेच ५,५९,७२३ इतकी झाली, यावेळी वंचित बहुजन आघाडीने संजय हेडाऊ यांना उभे केले होते त्यांनी देखील ६५,५७२ इतकी मते मिळवली तर राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना २,१५,३८० इतकी २४ टक्के मतेच मिळाली.

या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडे अंबरनाथ, भाजपकडे उल्हासनगर, कल्याण पूर्व आणि डोंबिवली असे तीन म्हणजेच युतीचे एकूण चार, तर मनसे व राष्ट्रवादीकडे कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा असे प्रत्येकी एक विधानसभा मतदारसंघ येतात. महाविकास आघाडी इथून कोणाला उमेदवारी देते हे बघणे इथे औत्सुक्याचे ठरणार आहे. या संपूर्ण मतदारसंघात आगरी मतांचे प्राबल्य आहे. तर मुंब्रा मतदारसंघ हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्या देशभर गाजलेल्या वादामुळे कल्याण ग्रामीण या मतदारसंघात निश्चितच फरक पाडणार आहे. त्यामुळे परांजपे यांचा इशारा युतीच्या मतांमध्ये दखल घेण्याजोगा फरक पाडू शकतो, त्याने निकालात जरी फरक पडणार नसला तरी मताधिक्यात फरक पडू शकतोच.

गेल्या तीन निवडणुकांची आकडेवारी इथे सविस्तर देण्याचे कारण एवढेच की, २००९ पासून या मतदारसंघात शिवसेना भाजपची मतांची आकडेवारी वाढतच आहे, अर्थात त्याला नरेंद्र मोदी या नावाचे गारुडच कारणीभूत आहे, हे मताधिक्य ज्या मतदारसंघातून येते ते डोंबिवली आणि कल्याण या दोन शहरात असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच भाजप आणि शिवसेना यांचे एकगठ्ठा मतदान येथे युतीच्या उमेदवाराला होत असते हे विसरून चालणार नाही. तर गेल्या तीनही निवडणुकांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर राष्ट्रवादी काँग्रेसची मतेही कमी होताना दिसत आहेत.

अबकी बार चारसौ पार हे टार्गेट असल्याने यावेळी तर संघ आणि भाजप निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरलेला असेल, अर्थात तसा तो दरवेळीच या मतदारसंघात उतरलेला असतो. त्यातून ही जागा आता मुख्यमंत्री पुत्र डॉ शिंदे यांची असल्याने यावेळी प्रतिष्ठा पणाला लागलेली असणार आहे. महायुतीमध्ये एकत्रित निवडणुका लढवत असताना आपल्या नेतृत्वाबाबत कोणी चुकीचे बोलत असेल तर, या बोलण्याची तातडीने दखल घेतली गेली आहे हे बोलणाऱ्या पक्षांसह सर्वांनाच समजण्यासाठी, तीव्र नाराजी व्यक्त करावीच लागते आणि त्याचवेळी कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी प्रतिईशारे देखील द्यावेच लागतात. राजकारणात हे केले नाहीतर गृहीत धरले जाते हा देखील साधा नियम आहे. मात्र महायुती म्हणून निवडणूक लढवत असताना युतीतील नेत्यांचा कुठल्याही वक्तव्यामुळे गणितं बिघडणार नाहीत याची काळजी मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या तिघांना घ्यावीच लागणार आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी योग्यवेळी दिलेला इशारा तीनही पक्षांनी गांभीर्याने घेतलाच पाहिजे.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात