मुंबई : काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप सोबत गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Shankarrao Chavan )यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसमध्ये काय राहिलं आहे? असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे. आता या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत . अशोक चव्हाण यांना बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी काँग्रेसच्या नावावर खूप कमावलं आहे. त्यांनी राजयोग भोगला आहे. उलट काँग्रेसला संपवण्याचा अशोक चव्हाण यांनी प्लान केला होता, असा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
चव्हाणांची भोकर विधानसभेत काय अवस्था आहे हे आपण पाहतोय .लोक त्यांना तेथे येऊ देत नाहीत . त्यामुळं काँग्रेसवर बोलणं त्यांनी आता टाळावं. काँग्रेसच्या नावावर खूप कमविलं तुम्ही, काँग्रेसच्या नावानं खूप राजयोग भोगला. काँग्रेसला कसं संपवायचं याचा त्यांनी प्लॅन केला होता, बरं झालं आज ते आमच्यात नाही . तसेच ज्या आईने तुम्हाला नाव दिलं, ज्या आईने तुम्हाला मोठं केलं, त्याचं आईची बदनामी करायला तुम्ही निघत असाल तर लोकं तुम्हाला माफ करणार नाही, असा हल्लाही पटोले यांनी चढवला आहे .याच दरम्यान त्यांनी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसला पाठिंबा देऊ, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. मात्र आम्ही महाविकास आघाडीत आहोत. त्यांना काही जाहीर करायचं असेल तर महाविकास आघाडीच्या अनुषंगाने जाहीर करायचं असतं. एखाद्या पक्षाबाबत भूमिका घेणं योग्य नाही. परवा मी जाणार आहे अकोल्याला. त्यावेळी त्यांना तेथेच उत्तर देऊ असं नाना पटोले म्हणाले आहेत .
तसेच या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान गेल्या अडीच महिन्यांपासून मला सातत्यानं टार्चर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मी पण ओबीसी समाजाचा आहे, शेतकरी आहे. मात्र, वंचितची भाषा आज कळायला मार्ग नाही. मात्र, त्याचं उत्तर दिलं पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही हे सगळे प्रश्न अकोल्यात विचारू. ज्या पद्धतीने त्यांनी त्यांची भूमिका मांडली, तशीच आमचीही भूमिका आम्ही तिथं जावून मांडू, असे म्हणत नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडरांवर हल्लाबोल चढवला आहे .