पुणे : मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षासोबत जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. दरम्यान वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुणे लोकसभेतून त्यांना तिकीट देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे वंचितकडून बारामतीतून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीतून वंचित उमेदवार जाहीर करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
वंचितकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून अविनाश बोसीकर (लिंगायत), परणीतून बाबासाहेब भुजंगराव उगळे (मराठा), औरंगाबादेतून अफसर खान (मुस्लीम), पुण्यातून वसंत मोरे (मराठा), शिरूरमधून मगनलदास बागुल (मराठा) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वसंत मोरेंनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचीदेखील भेट घेतली होती. पण काँग्रेसकडून पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. अखेर आज पुण्यातून वंचितकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून याआधी 19 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज वंचितकडून आणखी 5 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.