X: @therajkaran
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सांगली दौऱ्यापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगली लोकसभेसाठी (Sangli Lok Sabha) रणशिंग फुकलं आहे. कोल्हापूरची जागा आमची असताना आम्ही ती हसत हसत सोडली, पण आता सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही, अशी भूमिका राऊत यांनी घेतली आहे. त्यामुळे सांगली लोकसभेची जागा आता नेमकी कोणाच्या पारड्यात जाणार? याची राजकीय उत्सुकता पश्चिम महाराष्ट्रात शिगेला पोहोचली आहे.
सांगलीत वसंतदादा पाटील यांच्या स्मारकावर जाऊन श्रद्धांजली अर्पण करणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने बोलताना राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्याशी देखील चर्चा सुरू असल्याचे संगीतले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादी जागा आमची असावी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने ताकदीने लढवावी यामध्ये काही चुकीच असल्याचे मला वाटत नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता सांगली लोकसभेची जागा कोणाकडे जाणार याची चर्चा रंगली आहे.
राऊत म्हणाले, आज सकाळी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. यानंतर उद्धव ठाकरे आणि मी आणि आमचे प्रमुख नेते कोल्हापूरकडे रवाना होणार आहोत. याठिकाणी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देणार आहोत, तसेच त्यांचे आशीर्वाद घेणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
काँग्रेस पक्ष हा देशातील मोठा पक्ष असून महाराष्ट्रामध्ये शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत. सर्व पक्ष येऊन एकत्र येत इंडिया आघाडी (INDIA) झाली आहे. आम्ही राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड याठिकाणी जागा मागत नाही. प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यातील सीट मागतो आहे. त्यांचं अस्तित्व, कार्यकर्ते त्यावर अवलंबून असते. ते पुढे म्हणाले की, भिवंडीबाबत आम्ही सगळे एकत्र आलो, तर ती जागा आम्ही भाजपकडून काढून घेऊ. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेही भिवंडी जागेबाबत दावा करत आहेत, असेही राऊत म्हणाले.